Thursday, November 19, 2026

बलरामपूरमध्ये दाट धुक्याचा कहर! भीषण अपघातात 3 तरुणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरौला परिसरात दाट धुक्यात दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात दाट धुक्यामुळे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तरौला भागातील अक्सीबरहरा गावाजवळ हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दाट धुक्याची चादर पसरलेली असताना दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने हा मोठा अनर्थ घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य तात्काळ सुरू केले. प्राथमिक तपासानुसार, या अपघातादरम्यान काही पादचारीदेखील जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना पोलिसांनी तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना उच्च वैद्यकीय संस्थेत हलवण्यात आले आहे.

या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांची ओळख पटली असून सर्वजण बलरामपूर जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत. मृतांमध्ये बरदाही येथील गुफरान (18), बरहरा खुर्द गौरीआंडीह येथील सलीम (20), चंद्रपूर चितई येथील रहमत (30), छप्रताळवा येथील तौफिक (19) आणि बरहरा खुर्द येथील मोहम्मद फारूक (20) यांचा समावेश आहे. याशिवाय गंभीर जखमी झालेल्यांमध्ये उत्तरौला येथील बरहरा खुर्द गौरीआंडीह पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे मुजम्मिल खान (20) आणि नाहिद अली (18) यांचा समावेश आहे. या तरुणांवर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मार्तंड प्रकाश सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले. मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती देण्यात आली असून पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन खराब झालेल्या मोटारसायकली, दोन तुटलेली हेल्मेट आणि एक मृत बकरी जप्त केली आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला दाट धुक्यामुळे वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >