शहरात सध्या १० टक्के पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत खासगी टँकरचालकांकडून नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेकडून १० हजार लिटर पाण्यासाठी सुमारे ७०० रुपये मोजावे लागतात, मात्र हेच पाणी नागरिकांना ३५०० रुपयांना विकलं जातंय. काही ठिकाणी तर ८ हजार रुपयांपर्यंत पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या मनमानीला चाप लावण्यासाठी टँकरचे दर निश्चित करून अधिकृत दरपत्रक जाहीर करावं, टँकरची ऑनलाइन नोंदणी आणि GPS ट्रॅकिंग सक्तीचं करावं, अशी मागणी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
पाणीकपातीमुळे घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील अनेक सोसायट्यांना खासगी टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. मात्र टँकर वेळेवर मिळत नाहीत आणि क्षमतेनुसार दरात मोठी तफावत असल्याने नागरिकांचं बजेट कोलमडलं आहे. या पार्श्वभूमीवर डावखरे यांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेऊन पाणीपुरवठ्याच्या नियोजनासह इतर नागरी प्रश्नांवर चर्चा केली.
काय आहे मागणी?
खासगी टँकरची अधिकृत नोंदणी करून त्यांच्या क्षमतेनुसार दर ठरवावेत. हे दर महापालिकेच्या वेबसाईटवर आणि प्रभाग कार्यालयात प्रसिद्ध करावेत. मुंबईसह बाहेरून ठाण्यात येणाऱ्या टँकरचीही नोंद ठेवून पाण्याचा स्रोत तपासावा. नागरिकांना टँकर मागवण्यासाठी ऑनलाइन सुविधा द्यावी. नोंदणीकृत टँकरना GPS बसवून त्यांचं लोकेशन आणि पाणी वितरणावर लक्ष ठेवावं. जास्त पैसे घेणाऱ्या चालकांविरोधात तक्रार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, असं डावखरे यांनी म्हटलं आहे. महापालिकेने स्वच्छ केलेल्या विहिरी आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. यातून रोज किती पाणी मिळतं आणि किती लोकांना फायदा होतो, याची माहिती जाहीर करावी. प्रत्येक भागातील पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक जाहीर करून कमी दाबाने पाणी मिळणाऱ्या भागांचा प्रश्न सोडवावा. जुन्या जलवाहिन्यांची तपासणी करून गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
दाऊदच्या जुन्या घरावर बुलडोझर! मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई
मुंबई: अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमच्या घरावर मुंबई महानगर पालिकेने हातोडा चालवला आहे. दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया इस्टेट जवळील ...
कळवा येथील पारसिक चौपाटीची रखडलेली कामं पूर्ण करून तिथे स्वच्छता, देखभाल आणि सुरक्षा व्यवस्था करावी. सुरक्षा रक्षक नेमून वॉकिंग ट्रॅकवर दुचाकींना बंदी घालावी. महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानकं, बसथांबे, बाजारपेठा आणि महाविद्यालय परिसरातील अंधाऱ्या ठिकाणी पथदिवे आणि सीसीटीव्ही बसवावेत. महापालिका आणि पोलिसांनी एकत्र पाहणी करून असुरक्षित ठिकाणांवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही डावखरे यांनी केली. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा, टँकर व्यवस्थेत पारदर्शकता आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने या मागण्यांवर वेळेत कार्यवाही करावी, असं त्यांनी स्पष्ट केलं.