Thursday, November 19, 2026

पोलीस भरतीच्या सरावासाठी राज्यातील मैदाने विनामूल्य उपलब्ध होणार

‘मिशन खाकी’अंतर्गत राज्य सरकारचा उपक्रम; पहाटे आणि सायंकाळी सरावाची मुभा

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. ‘मिशन खाकी’अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना सरावासाठी मैदान उपलब्ध होत नसल्याची अडचण ‘मिशन खाकी’च्या माध्यमातून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आली होती. राज्यभरातील युवकांशी संवाद साधताना मैदानांची अनुपलब्धता ही त्यांच्या तयारीतील मोठी अडचण असल्याचे समोर आले. तरुणांच्या मेहनतीला योग्य पायाभूत सुविधांची जोड मिळावी आणि पोलीस दलात सेवा करण्याच्या त्यांच्या स्वप्नाला बळ मिळावे, यासाठी कदम यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र लिहून मैदाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. शिंदे यांनी या मागणीची दखल घेत निर्णय मार्गी लावल्याचे कदम यांनी सांगितले.

नगरविकास विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मालकीची तसेच त्यांच्या व्यवस्थापनाखाली असलेली मैदाने आणि क्रीडांगणे पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून संबंधित संवर्गाची मैदानी चाचणी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना सरावाची परवानगी द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी पहाटे पाच ते सकाळी नऊ किंवा सायंकाळी चार ते रात्री आठ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

निर्देश काय ?

मैदाने उपलब्ध करून देण्याबरोबरच उमेदवारांसाठी आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्याचे निर्देशही अधिसूचनेत आहेत. त्यानुसार सरावासाठी स्वच्छ आणि सुरक्षित मैदान, क्रीडांगण तसेच धावपट्टी तयार ठेवावी लागणार आहे. सरावासाठी येणाऱ्या तरुणांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांवर असेल. तसेच प्राथमिक उपचारांची सोय करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, शिवछत्रपती क्रीडा संकुल, जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रे आणि मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांचे सहकार्य घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >