मुंबई : लातूरमध्ये काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी टिपू सुलतान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. देशमुख यांनी टिपू सुलतानला ‘शेर-ए-हिंद’ आणि ‘शहीद’ संबोधत कौतुक केल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ‘टीप्या आज जिवंत असता तर काँग्रेसमधील स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या एकाही नेत्याला हिंदू म्हणून श्वास घेता आला नसता,’ अशी घणाघाती टीका राणे यांनी केली.
लातूरमध्ये ‘शेर-ए-हिंद शहीद हजरत टिपू सुलतान सार्वजनिक जयंती समारोह समिती’च्या वतीने आयोजित कव्वाली कार्यक्रमाला अमित देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाची छायाचित्रे आणि व्हिडीओ त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. मुंबईतील कव्वाल अजीम नाजा यांनी सादर केलेल्या कव्वालीचे कौतुक करताना देशमुख यांनी कार्यक्रमातून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जात असल्याचे म्हटले होते. धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा सन्मान करणे, परस्परांमधील प्रेम, आदर आणि विश्वास वाढवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, टिपू सुलतानचा गौरव केल्याने भाजपने देशमुख यांना लक्ष्य केले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, ‘ज्या टिप्याने हजारो हिंदुंची हिंदूंची हत्या केली, धर्मांतर केले आणि इस्लामचा प्रसार करण्यासाठी हिंदू धर्म संपवण्याचे काम केले, त्या टिप्याला मोठे करण्याचे काम काँग्रेसचे नेते सातत्याने करत असतात. त्यांना एक लक्षात येत नाही की, हा टिप्या आज जिवंत असता तर काँग्रेसमधील हे हिंदू नेते, स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक हिंदू म्हणून श्वास तरी घेऊ शकले असते का? कदाचित अमित देशमुख हे विसरले असतील. या हिंदू राष्ट्रात, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात जिहाद करणाऱ्या टिप्याचे उदात्तीकरण केले जात असेल, त्याच्या नावाने पुस्तके वाटण्याची भाषा केली जात असेल, तर हे सहन केले जाणार नाही. औरंग्याला जसे महाराष्ट्राच्या भूमीत गाडले, त्याचप्रमाणे सनातन हिंदू धर्माच्या विरोधात जाणाऱ्यांना आणि टिप्याचे समर्थन करणाऱ्यांना या मातीत गाडण्याची ताकद हिंदू समाजात आहे, हे लक्षात ठेवा’, असा इशाराही मंत्री राणे यांनी दिला.