चिमुकल्याचे नाव आणि खास पोस्ट
सोशल मीडियावर फोटो शेअर करत समंथा आणि राज यांनी आपल्या बाळाचे नाव 'देव' (Dev) ठेवल्याचे जाहीर केले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी लिहिले आहे की, "आमचा सुंदर मुलगा देव निदिमोरू - १९.११.२०२६. आमचे मन आजवर कधीही इतके आनंदी नव्हते. - समंथा आणि राज." या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या जोडीचे अभिनंदन करत नवजात बाळावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
लग्नाचा सोहळा आणि आई-बाबा होण्याची घोषणा
समंथा आणि राज यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी कोईम्बतूरमधील सद्गुरूंच्या ईशा फाउंडेशनमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले होते. दोघांच्याही आयुष्यातील हा दुसरा विवाह आहे. याआधी राज यांचा श्यामली डे यांच्याशी विवाह झाला होता, तर सामंथाने अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केले होते. जवळपास चार वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर २०२१ मध्ये समंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जून २०२६ मध्ये समंथाच्या 'माँ इंती बंगारम' या चित्रपटाच्या सक्सेस मीटदरम्यान या जोडीने आपण लवकरच पालक होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती.
भेटीपासून लग्नापर्यंतचा प्रवास
'द फॅमिली मॅन २' या लोकप्रिय वेब सीरिजच्या चित्रीकरणादरम्यान समंथा आणि राज यांची ओळख झाली होती. या सीरिजमध्ये सामंथाने 'राजी' नावाची बंडखोर भूमिका साकारून मोठी लोकप्रियता मिळवली होती. पुढे 'सिटाडेल: हनी बनी' या वेब सीरिजच्या निमित्ताने दोघांनी पुन्हा एकत्र काम केले. लग्नापूर्वी समंथा आणि राज यांनी सुमारे दोन वर्षे एकमेकांना डेट केल्याची चर्चा होती, मात्र दोघांनीही आपले नाते नेहमीच खाजगी ठेवले आणि कधीही जाहीरपणे त्यावर भाष्य केले नव्हते. आता बाळाच्या आगमनाने या जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचे नवे वातावरण निर्माण झाले आहे.