Pune Cyber Crime : विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; पुण्यातील महिला डॉक्टरची 3 लाखांची फसवणूक
सुरुवातीला पुणे सायबर पोलीस ठाण्यात नोंद झालेला हा गुन्हा पुढील तपासासाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
November 20, 2026 07:04 PM
पुणे : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात आहे. आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून पुण्यातील एका महिला डॉक्टरची 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवल्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून आरोपींनी डॉक्टरकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे.
22 ते 27 ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी 43 वर्षीय महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुरुवातीला पुणे सायबर पोलीस ठाण्यात नोंद झालेला हा गुन्हा पुढील तपासासाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
नांगरे पाटील यांचे सहाय्यक असल्याचे सांगून फोन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महिला डॉक्टरला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण सायबर सेल ऑफ इंडियातून बोलत असून विश्वास नांगरे पाटील यांचा सहाय्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीने फोन करून आपण मुंबई क्राईम ब्रँचचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले.
या व्यक्तींनी डॉक्टरचे आधार कार्ड एका संशयास्पद मोबाईल क्रमांकाशी जोडले असल्याचा दावा केला. तसेच अश्लील संदेश पाठवून पैसे कमावल्याचा आणि मनी लाँड्रिंग तसेच टेरर फंडिंगच्या प्रकरणात नाव आल्याचा आरोप केला. अटक टाळायची असेल तर सांगितलेल्या बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. या धमकीला घाबरून डॉक्टरने आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर 3 लाख रुपये पाठवले.
यापूर्वीही नांगरे पाटील यांच्या नावाने फसवणूक
विश्वास नांगरे पाटील यांचे नाव आणि ओळख वापरून फसवणूक होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी त्यांच्या फोटोचा आणि आवाजाची नक्कल करून व्हिडिओ कॉलद्वारे एका व्यक्तीला डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्यात आली होती. या प्रकारात संबंधित व्यक्तीची 1 कोटी 4 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. त्या प्रकरणात सायबर पोलिसांनी कानपूर आणि इंदूर येथे कारवाई करून दोन आरोपींना अटक केली होती.
कोण आहेत विश्वास नांगरे पाटील?
विश्वास नांगरे पाटील हे 1997 च्या तुकडीतील महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान दाखवलेल्या शौर्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, कोल्हापूर परिक्षेत्र आणि नाशिक शहरात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 'मन में है विश्वास' आणि 'कर हर मैदान फतेह' ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.