
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
पी पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्ग येथे प्रस्तावित १८.३० मीटर रुंदीच्या विकास नियोजन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बुधवारी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १७ बांधकामे हटवण्यात आली आहे. सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (पी पश्चिम विभाग) कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.या ठिकाणी सद्यस्थितीत या मार्गाची रुंदी केवळ ४ मीटर होती. या कारवाईनंतर सुमारे ३० मीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित १८.३० मीटर रुंदीपर्यंत मोकळा करण्यात आला आहे. या रुंदीकरणामुळे गिरीश केणी चाळीजवळील मार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर झाला आहे. या कारवाईमुळे प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (पी पश्चिम विभाग) कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत परिरक्षण भागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, मोकळा करण्यात आलेला रस्ता वाहतुकीसाठी तातडीने खुला करता यावा, यासाठी रस्ते विभागाला सिमेंट काँक्रीटचा रस्ता त्वरित तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.






