Saturday, November 21, 2026

Narhari Zirwal : लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांचा माजी खासगी सचिव निलंबित

शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांवरून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला.

मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयाशी संबंधित लाचखोरी प्रकरणी त्यांचे तत्कालीन खासगी सचिव रामदास गाडे यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे. मंत्रालयात फेब्रुवारी २०२४ मध्ये उघडकीस आलेल्या कथित लाचखोरी प्रकरणानंतर त्यांना खासगी सचिवपदावरून हटवून मूळ विभागात पाठविण्यात आले होते. आता शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांवरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

निलंबनाचा आदेश जारी झाला, त्या वेळी गाडे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्यपालांनी त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुरुवात एका औषध दुकानाच्या मालकाने केलेल्या तक्रारीतून झाली होती. निर्मल शर्मा यांच्या औषध दुकानातील औषधांसाठी असलेल्या रेफ्रिजरेटरमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि ओआरएस पाकिटे ठेवल्याचे आढळल्याने दुकानाचा परवाना महिनाभरासाठी निलंबित करण्यात आला होता. या निर्णयाविरोधात त्यांनी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्रालयात अपील दाखल केले. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी ते मंत्रालयात गेले होते.

शर्मा यांच्या आरोपानुसार, सुनावणीदरम्यान त्यांना रामदास गाडे यांच्या केबिनमध्ये बसविण्यात आले. तेथे राजेंद्र धेरांगे नामक कर्मचाऱ्याने एक लाख १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यातील एक लाख रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, तर १० हजार रुपये स्वतःसाठी असल्याचे त्याने सांगितल्याचा शर्मा यांचा दावा आहे. नंतर ही रक्कम निम्मी करण्याची तयारीही दर्शविण्यात आली होती. शर्मा यांनी दोन हजार रुपये ऑनलाइन, तर ५३ हजार रुपये रोख दिल्याचा आरोप केला होता.

या कथित लाचखोरी प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर गाडे यांना प्रतिनियुक्तीवरून कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ विभागात पाठविण्यात आले होते. त्यानंतर ते मावळ येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता या प्रकरणाशी संबंधित शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांवरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >