PM Modi Nitish Setu inauguration : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ‘नीतीश सेतू’चे लोकार्पण; उत्तर आणि दक्षिण बिहारला जोडणाऱ्या सहा पदरी पुलाची खास वैशिष्ट्ये काय ?

पाटणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२ (NH-22) वरील कच्ची दर्गाह आणि वैशाली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३२२ (NH-322) वरील बिदुपूर यांना जोडणारा हा एकूण १९.७ किलोमीटरचा मोठा रस्ता प्रकल्प आहे. ‘नीतीश सेतू’ हा या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा पूल आधुनिक ‘एक्स्ट्रॉडोज्ड केबल-स्टे’ (extradosed cable-stayed) तंत्रज्ञानाचा वापर करून बांधला आहे. या पुलामुळे सध्याचे महात्मा गांधी सेतू आणि जेपी सेतू या दोन्ही पुलांवरील वाहतुकीची कोंडी आणि ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच, ज्या ग्रामीण भागांचा पाटण्याशी चांगला रस्ता संपर्क नव्हता, तिथल्या नागरिकांना आता पाटण्याला पोहोचण्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज शनिवारी बिहारमधील वैशाली जिल्ह्यात गंगा नदीवर बांधलेल्या एका भव्य सहा पदरी पुलाचे उद्घाटन करणार आहेत. या नवीन पुलामुळे उत्तर आणि दक्षिण बिहारमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावावरून या पुलाला ‘नीतीश सेतू’ असे नाव देण्यात आले आहे. तब्बल ४,२८० कोटी रुपये खर्चून उभारलेला हा पूल ९.७६ किलोमीटर लांब असून, तो वैशालीतील बिदुपूर आणि पाटण्याजवळील कच्ची दर्गाह या दोन भागांना थेट जोडणार आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.



काय आहे या ‘नीतीश सेतू’ची वैशिष्ट्ये ?


पाटणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२ (NH-22) वरील कच्ची दर्गाह आणि वैशाली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३२२ (NH-322) वरील बिदुपूर यांना जोडणारा हा एकूण १९.७ किलोमीटरचा मोठा रस्ता प्रकल्प आहे. ‘नीतीश सेतू’ हा या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा पूल आधुनिक ‘एक्स्ट्रॉडोज्ड केबल-स्टे’ (extradosed cable-stayed) तंत्रज्ञानाचा वापर करून बांधला आहे. या पुलामुळे सध्याचे महात्मा गांधी सेतू आणि जेपी सेतू या दोन्ही पुलांवरील वाहतुकीची कोंडी आणि ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच, ज्या ग्रामीण भागांचा पाटण्याशी चांगला रस्ता संपर्क नव्हता, तिथल्या नागरिकांना आता पाटण्याला पोहोचण्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे.


या पुलाचा सर्वात मोठा फायदा वैशाली जिल्ह्यातील 'राघोपूर दियारा' या भागाला होणार आहे. हा परिसर चारही बाजूंनी गंगा नदीने वेढलेला असल्यामुळे येथील लोकांना पाटण्याशी जोडणारे चांगले रस्ते नव्हते. आता या पुलामुळे येथील रहिवाशांना चांगली रुग्णालये, शाळा-महाविद्यालये आणि इतर अत्यावश्यक सुविधांसाठी पाटण्याला जाणे अत्यंत सोपे होईल. केवळ सामान्य प्रवाशांसाठीच नाही, तर उत्तर बिहारमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठीही हा पूल खूप फायदेशीर ठरणार आहे. शेतमाल आणि कारखान्यांतील वस्तू मोठ्या बाजारपेठांमध्ये नेण्यासाठी वेगवान रस्ता उपलब्ध झाल्यामुळे व्यापाराला मोठी गती मिळेल.


उत्तर बिहारची जमीन अत्यंत सुपीक आहे आणि तिथे लोकसंख्याही जास्त आहे. या पुलामुळे येथील कृषी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास राज्य सरकारला वाटतो. खास करून लिची, केळी, मका आणि भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा माल खराब होण्याआधीच थेट बाजारपेठेत पोहोचवणे आता शक्य होणार आहे. याशिवाय, बिदुपूर ते कच्ची दर्गाह हा संपूर्ण मार्ग भविष्यात पर्यटन आणि मालवाहतुकीचे (लॉजिस्टिक्स) मोठे केंद्र म्हणून विकसित होईल आणि त्यामुळे या भागात मोठी गुंतवणूक येईल, अशी अपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



पुलाच्या नावावरून रंगला राजकीय वाद


एकीकडे विकासाचा हा मोठा प्रकल्प सुरू होत असताना, दुसरीकडे या पुलाच्या नावावरून बिहारच्या राजकारणात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सत्ताधारी भाजप-जेडी(यू) आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीमध्ये (राष्ट्रीय जनता दल) या प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून वाद पेटला आहे. जेडी(यू) प्रमुख नितीश कुमार यांचे नाव या पुलाला देण्याच्या निर्णयावर आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी आक्षेप घेतला असून भाजपवर टीका केली आहे. नितीश कुमार यांचे राजकीय करिअर आता संपले आहे, असा संदेश भाजपला यातून द्यायचा आहे का, असा टोला यादव यांनी लगावला आहे. यावर बोलताना यादव म्हणाले की, "कोणतीही व्यक्ती जिवंत असताना तिचे पुतळे उभारले जात नाहीत किंवा तिच्या नावावरून कोणत्याही पुलाला नाव दिले जात नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच कदाचित नितीश कुमार राजकीयदृष्ट्या संपले आहेत, असा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असावा."


या पुलाला स्वातंत्र्यसैनिक आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचे विश्वासू सहकारी अक्षयवट राय यांचे नाव द्यावे, अशी मागणी आपल्या पक्षाने यापूर्वीच केली होती, असेही यादव यांनी सांगितले. "हा प्रकल्प जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात होता, तेव्हा मी आणि लालूजींनी नितीशजींना विनंती केली होती की या पुलाला अक्षयवट राय यांचे नाव द्यावे. याबाबत मी पत्रही लिहिले होते," असे त्यांनी स्पष्ट केले. या टीकेला भाजपनेही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. बिहार भाजपचे प्रवक्ते कुंतल कृष्णा यांनी यादव यांना "विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना परदेशात फिरायला जाणारे बेजबाबदार नेते" असे म्हणत त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. "तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने आजवर फक्त लूटच केली आहे. हा पूल म्हणजे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासाची साक्ष आहे आणि त्या कामाचा हा सन्मान आहे," असे भाजप प्रवक्त्यांनी सुनावले.


दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी यांनीही आरजेडीचे श्रेय घेण्याचे प्रयत्न फेटाळून लावले आहेत. यादव उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे रस्ते बांधकाम खाते होते, त्यामुळे त्यांना या पुलाचे श्रेय मिळावे, हा युक्तिवाद चौधरी यांनी धुडकावून लावला. "अशा विचित्र मागणीचे मला आश्चर्य वाटते आणि त्यावर चर्चा केली जात आहे, याचे तर त्याहूनही जास्त नवल वाटते," असे चौधरी म्हणाले. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री असताना २०१२ मध्ये या प्रकल्पाला पहिल्यांदा मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षांनी, म्हणजेच २०१५ मध्ये या पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली होती आणि आज हा पूल जनतेच्या सेवेत दाखल होत आहे.

Comments
Add Comment

ॲप्पलकडून जगभरातील ग्राहकांना खुशखबर, 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना मोठं गिफ्ट

मुंबई: ॲप्पल आयफोनची क्रेझ अगदी लहानांपासून मोठ्यापंर्यंत प्रत्येकामध्ये पाहायला मिळते. कोणताही फोन असो,

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण! एका आठवड्यात 11 हजारांनी सोने स्वस्त, चांदीही कोसळली

Gold Rate : गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर घसरत आहेत. मात्र गेल्या वर्षभरातील सोन्याचे दर तब्बल 40 हजार रुपयांनी

आईला अखेरचा निरोप देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भावुक, डोळ्यांत तरळले अश्रू

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचं काल दुपारी

IBPS Mains Result 2026 : IBPS PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 7,565 पदांसाठी भरती, पात्र उमेदवारांना मुलाखतीची संधी

Education News: बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग

PM Modi Bihar Visit : PM मोदींचा वैशाली दौरा! बिहारला मिळणार ३४,४७० कोटींच्या प्रकल्पांची मोठी भेट!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शनिवार (२१ नोव्हेंबर) रोजी बिहारच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जात आहेत.

Unique Temples In India : देवाला वाहिली जाते दारू, पेटती सिगारेट आणि खेळण्यातली विमाने! भारतातील या अनोख्या मंदिरांमधील विचित्र प्रथा वाचून व्हाल थक्क

नवी दिल्ली : आपल्या देशात मंदिरात गेल्यानंतर देवाच्या चरणी फुले, नारळ, पेढे आणि अगरबत्ती वाहणे ही अगदी नेहमीची