Sunday, November 22, 2026

Mumbai Water: मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी BMCचा नवा प्लॅन, भांडुपमध्ये 2 हजार MLD क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र

मुंबईच्या वाढत्या पाणीपुरवठ्याची गरज पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने भांडुप संकुलात 2000 MLD क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र आणि जल उदंचन केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळाची पाहणी करून 31 मे 2028 पर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, या प्रकल्पांमुळे शहराच्या दीर्घकालीन जलसुरक्षेला मोठी बळकटी मिळणार आहे.

मुंबई: मुंबई शहराचा पाणीपुरवठा सुरळितपणे सुरू राहण्‍यासाठी भांडुप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) प्रतिदिन क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्‍याचे काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. शिवाय, नवीन 2 हजार दशलक्ष लीटर जलशुद्धीकरण केंद्रातून येणारे पाणी महासंतुलक जलाशयात पोहोचविण्‍यासाठी 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) प्रतिदिन क्षमतेचे नवीन जल उदंचन केंद्र (Pumping Station) देखील उभारण्‍यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या प्रकल्पस्थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच, या दोन्‍ही महत्‍त्‍वपूर्ण प्रकल्पांची कामे दिनांक 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश दिले.

भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगराच्‍या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल हे आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या प्रकल्‍पाची एकत्रित पाणी शुद्धीकरणाची क्षमता प्रतिदिन 2810 दशलक्ष लीटर इतकी आहे. भांडुप येथे सुमारे 1910 दशलक्ष लीटर आणि 900 दशलक्ष लीटर पाणी शुद्धीकरण करू शकणारी दोन युनिट्स आहेत. पाणीपुरवठ्याची मागणी वाढत असल्‍याने भांडुप संकुल येथे 2000 दशलक्ष लीटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्‍यात येत आहे. त्‍यात हरिणीकरन संपर्क टाकी (Clorination Contact Tank), पाण्यातील गढूळपणा, सूक्ष्म घनकण व अशुद्धी वेगळे करण्याची जाणारी प्रगत जल शुद्धीकरण प्रक्रिया (Actiflo), जल प्रवाह दोन किंवा अधिक दिशांना अथवा विविध प्रक्रिया टाक्यांमध्ये समान प्रमाणात विभागून देणारी प्रवाह विभाजक यंत्रणा (Flow Splitter), द्विस्तरीय माध्यम गाळणी (Dual Media Filter), प्रतिप्रवाह धुलाई यंत्रणा (Backwash System), अ‍ॅक्टिडायन प्रक्रिया (Actidyn), सांडपाणी उपसा यंत्रणा (Waste Water Pumping System) आदींचा प्रामुख्‍याने समावेश आहे.

सद्यस्थितीत सुमारे 6 हेक्‍टर जागेवर 16 मीटर खोलवर खोदकाम झाले आहे. खोदकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याची विनिनिर्दिष्‍ट स्‍थळी वाहतूक करण्‍यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या सर्व बाबींची सविस्‍तर माहिती घेतली. दिनांक 31 मे 2027 पर्यंत उर्वरित खोदकाम पूर्ण करावे, खोदकाम, राडारोड्याची वाहतूक यांचे नियोजन करावे. त्‍याबरोबरच सिमेंट काँक्रीट (PCC), विद्युतीकरण, सीमाभिंत आदींचे काम समांतरपणे पूर्ण करावे. अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून प्रकल्प कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले. नवीन जल उदंचन केंद्र (Pumping Station) उभारण्‍याकामी खोदकाम वेगाने सुरू आहे. जमिनीपासून 20.5 मीटर खोलीपैकी 18 मीटर खोलवर खोदकाम झाले आहे. पर्यायी जलवाहिनी (Bypass Line), उर्ध्व दाब जलवाहिनी (Rising Main) आणि पंप हाऊस इमारतीसाठी आवश्‍यक खोदकाम 100 टक्‍के पूर्ण झाले आहे.

जल प्रवेशिका चेंबर (Inlet Chamber) आणि शुद्ध जल उपसा टाकी (Clear Water Pumping Sump) यांच्‍यासाठी सुमारे 85 टक्‍के खोदकाम पूर्ण झाले आहे. तर, 179 सूक्ष्म स्‍तंभांचे काँक्रीटीकरण (Micro Piling Concreting) कामदेखील पूर्ण झाले आहे. त्‍यांचा सविस्‍तर आढावा घेत बांगर म्‍हणाले की, कामे आव्‍हानात्‍मक असली तरी वेळापत्रक निश्चित करून संपूर्ण कामे पूर्णत्‍वास न्‍यावीत. स्‍थापत्‍य कामांबरोबरच विद्युतीकरणाची कामे समांतरपणे हाती घ्‍यावीत. त्‍यासाठी विविध टप्‍पे निश्चित करावेत. मनुष्यबळाची कुमक वाढवावी. मुंबईची वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, दीर्घकालीन जलसुरक्षेच्या दृष्टीने हे दोन्‍ही प्रकल्प महत्त्वपूर्ण आहेत. प्रकल्पांतर्गत सर्व स्थापत्य, विद्युत, यांत्रिक व प्रक्रिया अभियांत्रिकीविषयक कामांना गती द्यावी. समन्वय व नियोजनाद्वारे निर्धारित मुदतीपूर्वी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) दिलीप पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा