Monday, November 23, 2026

अमेरिकेतील म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अंदाधुंद गोळीबार; 9 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये एका म्युझिट कॉन्सर्टदरम्यान काही हल्लेखोरांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेमध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्यासह इतरत्र 9 जण जखमी झाले आहेत.

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफॉर्निया राज्यातील एका कार्यक्रमामध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मध्य कॅलिफॉर्नियातील एका संगीत कार्यक्रमामध्ये एका अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेमध्ये एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्या छातीला दुखापत झाली आहे. या गोळीबाराचे वृत्त अनेक इंग्रजी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. शिवाय, कॅलिफॉर्नियातील पोलिसांनीही तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांना या घटनेविषयीची माहिती दिली आहे.

मध्य कॅलिफॉर्नियातील डोंगराळ प्रदेशातील तुलारे काउंटीमधील स्ट्रॅथमोर या शहरामध्ये ह्या गोळीबाराची घटना घडली आहे. शनिवारी (21 नोव्हेंबर) संध्याकाळी 07.30 वाजेच्या सुमारास सुमारे 150 लोक उपस्थित असलेल्या एका संगीत कार्यक्रमात गोळीबार झाल्याची माहिती काउंटी शेरीफ विभागाने एका निवेदनात दिली आहे. उपस्थितांपैकी एका संशयितांने जमावावर गोळीबार केला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या पोलिसांकडून घटनेची सविस्तर चौकशी केली जात असून लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

छातीला गोळी लागलेल्या व्यक्तीचे वय 26 वर्षे असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्यावर जवळच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून छातीमध्ये लागलेली बंदुकीची गोळी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्याच्या छातीतून यशस्वीपणे बंदुकीची गोळी काढली असून त्याची प्रकृती मात्र चिंताजनक असल्याची माहिती शेरीफ विभागाने दिली. 19 आणि 22 वय वर्षे वयोगटातील इतर दोन तरुणांवरही शस्त्रक्रिया करावी लागली, इतर सहा जण किरकोळ जखमी आहेत. दरम्यान, झालेल्या ह्या गोळीबारासंबंधी कोणत्या टोळीचा संबंध आहे का? याचा तपास यंत्रणांकडून तपास केला जात आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, स्थानिक पोलिसांकडून संशयितांचा शोध आणि पुढील तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "गोळीबाराची घटना कोणत्या टोळीने केला असण्याची शक्यता आहे", असा त्यांचा विश्वास आहे, परंतु त्यांनी यावर अधिक तपशील दिला नाही. सुमारे 3000 लोकसंख्या असलेल्या या शहरात झालेल्या कार्यक्रमात शेजारच्या राज्यांतील कलाकारांनी सादरीकरण केले होते, असे विभागाने सांगितले. घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, नागरिकांना सध्या कोणताही धोका नसल्याचे तुलारे काउंटीच्या शेरीफ विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >