Monday, November 23, 2026

Rahul Narwekar: आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी फेटाळला

अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा खासदार संजय राऊत यांनी केलेला आरोप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळला

मुंबई : अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा खासदार संजय राऊत यांनी केलेला आरोप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळला आहे. संबंधित जमीन आदिवासींची नसून भोगवटा क्रमांक 1ची आहे. तसेच, आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र संबंधितांनी दिले होते, असा दावा नार्वेकर यांनी केला आहे.(Rahul Narwekar)

संजय राऊत यांनी पत्राद्वारे नार्वेकर यांच्यावर म्हात्रोळी (सारळ) येथील गरीब आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना नार्वेकर यांनी सांगितले की, 2024 पर्यंत संबंधित जमिनीची मालकी बलदेवसिंह जाला यांच्याकडे होती. नार्वेकर यांच्या पत्नीने ही जमीन 2024 नंतर जाला यांच्याकडून खरेदी केली. आदिवासींनी 2024 पूर्वी केलेल्या तक्रारींचा निपटारा झाला असून, त्या तक्रारींमध्ये नार्वेकर कुटुंबाचा उल्लेखही नव्हता.(Tribal Land Controversy)

दरम्यान, म्हात्रोळी येथील आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाने 2025 मध्ये सविस्तर चौकशी अहवाल सादर केला होता. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अलिबागचे अपर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण यांनी हा अहवाल तयार केला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून परिस्थितीची तपासणी केली होती. या अहवालानुसार, म्हात्रोळी येथील 19 आदिवासी कुटुंबांसाठी पर्यायी जागेवर 19 खोल्यांची घरे बांधून देण्यात आली. काही कुटुंबांनी या घरांमध्ये वास्तव्यास सुरुवात केली, तर उर्वरित आठ जणांना त्यांच्या पसंतीनुसार घरे बांधण्यासाठी मोबदला देण्यात आला.

संबंधित कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय, आदिवासी कुटुंबांना पैसे आणि बोअरवेलची सुविधाही देण्यात आल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. पुनर्वसनानंतर संबंधितांनी कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. मांडवा सागरी पोलीस ठाण्याकडूनही या प्रकरणातील तक्रारींची चौकशी करण्यात आली होती. त्या वेळी काही तक्रारदारांनी तक्रार शिल्लक नसल्याचे लेखी स्वरूपात कळवले होते. स्थळपाहणी, चौकशी आणि संबंधित कुटुंबांच्या जबाबांच्या आधारे प्रशासनाने वस्तुस्थितीचा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे सादर केला होता. हे प्रकरण निकाली काढण्याची विनंतीही अलिबाग प्रशासनाने आयोगाकडे केली आहे, असे नार्वेकर म्हणाले.(Land Grab Allegations)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >