Monday, November 23, 2026

Asia Power Index 2026 : आशियातील महासत्तांच्या यादीत भारताची मोठी झेप ! जपान आणि रशियाला टाकले मागे

२०१८ नंतर पहिल्यांदाच चीन आणि भारताच्या सामर्थ्यातील अंतर सर्वात कमी नोंदवण्यात आले आहे. या अहवालात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रभावी नेते म्हणून स्थान देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Asia Power Index 2026 : आशियातील सर्वात शक्तिशाली देश कोणता? या प्रश्नाचे उत्तर देणारा २०२६ चा 'एशिया पॉवर इंडेक्स' जाहीर झाला आहे. या यादीत भारताने मोठी झेप घेत जपान आणि रशियाला मागे टाकले आहे. भारताने तिसरे स्थान पटकावले असून, आशियातील एक प्रमुख महासत्ता म्हणून भारताचा दबदबा वाढत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, या यादीत अमेरिका पहिल्या तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कोणत्या देशाला कितवे स्थान ?

ऑस्ट्रेलियातील लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेकडून दरवर्षी एशिया पॉवर इंडेक्स प्रसिद्ध केला जातो. आशिया खंडातील देशांची आर्थिक, लष्करी, राजनैतिक आणि सामरिक ताकद या निर्देशांकाच्या माध्यमातून मोजली जाते. यासाठी १३१ निकषांच्या आधारे २७ देश आणि प्रदेशांचे मूल्यांकन केले जाते. २०२६ च्या या निर्देशांकात अमेरिका पहिल्या, चीन दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि इंडोनेशिया या देशांचा क्रमांक लागतो.

भारताचा प्रभाव वाढला

या वर्षी भारताचा पॉवर इंडेक्स स्कोअर वाढून ४०.५ वर पोहोचला आहे. त्यामुळे आशियातील प्रभावशाली देश म्हणून भारताची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे, २०१८ नंतर पहिल्यांदाच चीन आणि भारताच्या सामर्थ्यातील अंतर सर्वात कमी नोंदवण्यात आले आहे. या अहवालात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रभावी नेते म्हणून स्थान देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या राजनैतिक प्रभावात मोठी घसरण

एकीकडे भारताची ताकद वाढत असताना दुसरीकडे अमेरिकेच्या राजनैतिक प्रभावात सहा गुणांची घसरण झाली आहे. सलग चौथ्या वर्षी अमेरिकेच्या राजनैतिक प्रभावात घट झाली असून, ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. इराण युद्ध आणि अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा यावर परिणाम झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातील एकूण सामर्थ्याचे अंतरही कमी झाले आहे. दोन्ही देशांमध्ये आता केवळ ५.३ गुणांचा फरक असून, २०१८ नंतरची ही सर्वात कमी तफावत आहे. लष्करी क्षमतेच्या बाबतीतही दोन्ही देशांमधील अंतर अत्यंत कमी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया-जपानमधील लष्करी सहकार्य वाढले

या निर्देशांकात इंडोनेशियाच्या राजनैतिक प्रभावातही ५.५ गुणांची घसरण झाली आहे. ऊर्जा संकट, अमेरिकेचे टॅरिफ धोरण आणि दक्षिण चीन समुद्रातील वाढता तणाव यांचाही आशियातील देशांच्या सामर्थ्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरियाच्या राजनैतिक प्रभावातही घट नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या स्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे.

दरम्यान, चीन आणि रशियामधील व्यापार २५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. तर चीन आणि उत्तर कोरियामधील व्यापार २.८५ अब्ज डॉलरवर गेला आहे. ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील लष्करी सहकार्यही वाढले आहे. २०२२ मध्ये दोन्ही देशांदरम्यान पाच संयुक्त लष्करी सराव झाले होते. ही संख्या २०२५ मध्ये वाढून १३ वर पोहोचली. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच जपानने फिलिपाइन्समध्ये आपले भूदल पाठवले आहे.

एकूणच, २०२६ च्या एशिया पॉवर इंडेक्समधून भारताची वाढती ताकद, अमेरिका-चीनमधील स्पर्धा आणि आशियातील बदलते सामरिक समीकरण अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >