Monday, November 23, 2026

Cyber Crime News: WhatsApp Web वापरताना सावधान! सायबर गुन्हेगारांकडून खात्याचा गैरवापर होण्याचा धोका; I4C चा इशारा

वापरकर्त्यांनी एकदा संगणकावर WhatsApp Web लॉग इन केल्यानंतर योग्य पद्धतीने लॉग आउट केले नाही, तर त्यांच्या खात्याचा अनधिकृत वापर होऊ शकतो.

Cyber Crime News: WhatsApp Web वापरणाऱ्या युजर्ससाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण युनिटने (NCTAU) WhatsApp Web सेशनच्या गैरवापराबाबत सावध केले आहे. वापरकर्त्यांनी एकदा संगणकावर WhatsApp Web लॉग इन केल्यानंतर योग्य पद्धतीने लॉग आउट केले नाही, तर त्यांच्या खात्याचा अनधिकृत वापर होऊ शकतो. त्यामुळे खासगी संदेश, संपर्क आणि ग्रुपमधील संभाषणांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.

WhatsApp Web सेशनचा गैरवापर कसा होऊ शकतो?

गृह मंत्रालयाच्या I4C ने जारी केलेल्या सूचनेनुसार, आधीपासून लॉग इन असलेल्या WhatsApp Web सेशनचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार खात्यात प्रवेश मिळवू शकतात. अशा वेळी ते वापरकर्त्यांचे संदेश वाचू शकतात, त्यांच्या नावाने इतरांना मेसेज पाठवू शकतात आणि फसवणूक किंवा फिशिंगसारखे सायबर गुन्हे करू शकतात.

विशेषतः कार्यालयातील संगणक, सार्वजनिक संगणक किंवा इतरांसोबत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर WhatsApp Web वापरताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

WhatsApp Web वापरताना कोणती काळजी घ्यावी?

I4C ने वापरकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

  • प्रत्येक वेळी लॉग आउट करा: काम झाल्यानंतर WhatsApp Web मधून स्वतः लॉग आउट करा. केवळ ब्राउझरची विंडो किंवा टॅब बंद केल्याने लॉग आउट होत नाही.
  • सार्वजनिक संगणक टाळा: सायबर कॅफे, हॉटेलमधील संगणक किंवा अनोळखी उपकरणांवर WhatsApp Web वापरू नका.
  • संवेदनशील माहिती पाठवू नका: शासकीय, आर्थिक, संस्थात्मक किंवा गोपनीय माहितीची देवाणघेवाण WhatsApp Web वरून टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • इनकॉग्निटो मोड वापरा: तात्पुरत्या वापरासाठी विश्वसनीय संगणकावर प्रायव्हेट किंवा इनकॉग्निटो ब्राउझिंग मोडचा वापर करा. तरीही काम झाल्यावर मॅन्युअली लॉग आउट करणे आवश्यक आहे.
  • अनोळखी फाइल्स डाउनलोड करू नका: संशयास्पद लिंक, अज्ञात फाइल्स आणि क्रॅक केलेले सॉफ्टवेअर टाळा.
  • असामान्य हालचाली तपासा: आपल्या खात्यातून अनपेक्षित संदेश पाठवले जात असतील किंवा संपर्कांकडून विचित्र प्रतिसाद मिळत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

मोबाईल आणि ब्राउझर अपडेट ठेवा

I4C ने मोबाईल, संगणक, ऑपरेटिंग सिस्टिम आणि ब्राउझर नेहमी अपडेट ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सुरक्षा सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवणेही महत्त्वाचे आहे.

WhatsApp Web वापरताना थोडीशी निष्काळजीपणाही खात्याच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे विशेषतः ऑफिस किंवा सामायिक संगणकावर काम करताना लॉग इन आणि लॉग आउट करण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >