
नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर तेथील उद्ध्वस्त भागांची पुन्हा उभारणी करण्यासाठी आणि नेपाळच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी २४,००० कोटी नेपाळी रुपयांचे विशेष 'विकास सहकार्य पॅकेज' जाहीर केले आहे. नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन्द्र शाह (balendra Shah) हे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून, नवी दिल्लीतील भेटीदरम्यान ही मोठी घोषणा करण्यात आली. हैदराबाद हाऊस येथे दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय चर्चा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि बालेन्द्र शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला. ऑगस्ट महिन्यात नेपाळमध्ये आलेल्या पुरात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, याबद्दल मोदींनी तीव्र हळहळ व्यक्त केली. कोणत्याही कठीण प्रसंगी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल, असा विश्वास देत त्यांनी ही आर्थिक मदत जाहीर केली. या पॅकेजमागील भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, पुरामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांचे आयुष्य पुन्हा रुळावर आणणे, तिथे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नेपाळला अधिक बळकट करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे.
पंतप्रधान मोदींनी बालेन्द्र शाह यांचे भारतात आत्मीयतेने स्वागत केले. काही महिन्यांपूर्वीच जगातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शाह यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) जे भाषण दिले, त्यातून त्यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून आली होती, असे कौतुक मोदींनी केले. या वर्षाच्या सुरुवातीला नेपाळच्या जनतेने शाह यांना दिलेला प्रचंड पाठिंबा हा तिथल्या तरुणाईच्या स्वप्नांचे आणि आकांक्षांचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले. भारत आणि नेपाळ यांच्यातील नाते हे केवळ दोन शेजारी देशांचे नसून, ते रक्ताच्या नात्यासारखे आपुलकीचे आणि घट्ट विश्वासाचे आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. दोन्ही देशांचे आनंद आणि संकटे सारखीच आहेत, तसेच विकासाच्या प्रवासात आपण एकमेकांचे सोबती आहोत, असे नमूद करत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि नेपाळमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत एकत्र काम करण्यासाठी एकूण आठ महत्त्वाचे करार करण्यात आले. या करारांमध्ये अंतराळ विज्ञान, पोलीस व सुरक्षा प्रशिक्षण, सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, आरोग्य सेवा, आयुर्वेद, पर्यावरणपूरक शहरी विकास आणि शेती-पशुपालन या विषयांचा समावेश आहे. अंतराळ आणि दळणवळण क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताची अंतराळ संस्था 'इस्रो' (ISRO) आणि नेपाळचे माहिती व दळणवळण मंत्रालय यांच्यात करार झाला आहे. या कराराद्वारे 'दक्षिण आशिया उपग्रहा'चा (South Asia Satellite) अधिकाधिक लाभ घेण्यासाठी सॅटेलाईट कम्युनिकेशन नेटवर्क उभारले जाणार आहे.
नवी दिल्ली : भारताने गरिबी निर्मूलनाच्या क्षेत्रात मिळवलेले यश टिकवून ठेवण्यासाठी आता आर्थिक सेवा, बाजारपेठ आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा लाभ ...
पोलीस यंत्रणा आणि गुन्हे तपासातील वैज्ञानिक पद्धती (फॉरेन्सिक सायन्स) सुधारण्यासाठी दोन करार झाले आहेत. यातील पहिला करार गुजरातमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी आणि नेपाळ पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागामध्ये झाला. तर दुसरा करार भारताची राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी आणि नेपाळची नॅशनल पोलीस अकॅडमी यांच्यात करण्यात आला. नेपाळमधील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, यासाठी भारताच्या 'नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स'ने नेपाळच्या प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेशी करार केला आहे. या अंतर्गत नेपाळमधील सरकारी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
आरोग्य क्षेत्रात दोन्ही देशांनी दोन करारांवर शिक्कामोर्तब केले. यामध्ये आधुनिक आरोग्य आणि वैद्यकीय सेवांसोबतच आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषधोपचार पद्धतींचा प्रसार करण्यासाठी दोन्ही सरकारांमध्ये स्वतंत्र करार झाला. याशिवाय, शाश्वत शहरी विकास तसेच पशुपालन आणि मत्स्यव्यवसायाच्या वाढीसाठी तांत्रिक मदत देण्याचे करारही पार पडले. या करारांशिवाय दोन्ही पंतप्रधानांनी सीमाभागातील वाहतूक, वीज आणि पायाभूत सुविधांशी जोडलेल्या सहा मोठ्या प्रकल्पांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यामध्ये दोन्ही देशांतील सांस्कृतिक नाते अधिक घट्ट करण्यासाठी भारतातील अयोध्या ते नेपाळमधील जनकपूर दरम्यान धावणाऱ्या 'सरयू-कमला एक्सप्रेस' रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सीमेवरील रस्ते वाहतूक आणि व्यापार सुलभ व्हावा, यासाठी भारतातील धारचुला आणि नेपाळमधील दारचुला यांना जोडणाऱ्या नव्या मोटर पुलाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, बनबसा येथील एकात्मिक तपासणी नाक्याचे (ICP) भूमिपूजन करून भैरहवा, सुनौली आणि दोधरा चांदणी येथील तपासणी नाक्यांच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेत दोन्ही नेत्यांनी ६६९ मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या 'लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पा'ची पायाभरणी केली. यासोबतच नेपाळला होणारा इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोतिहारी-अमलेखगंज पाईपलाईनच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले आणि प्रस्तावित सिलीगुडी-झापा पेट्रोलियम पाईपलाईनचा भाग असलेल्या झापा येथील इंधन टर्मिनलचे भूमिपूजनही केले. नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी मार्च २०२६ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. रविवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झाल्यानंतर, सोमवारी सकाळी त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर राष्ट्रपती भवनात त्यांचे शासकीय इतमामात स्वागत करण्यात आले.





