
गोवा: गोवा येथे 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु आहे. या चित्रपट महोत्सवात अनेक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक अनुकूल निर्णय यावेळी घेण्यात आले आहेत. आज (सोमवारी) महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात येणार असून, कमी बजेटच्या चित्रपटांना सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच नवी यंत्रणा विकसित करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘इफ्फी’तील परिसंवादात दिली. चित्रपट निर्मिती, सहनिर्मिती, वितरण आणि प्रदर्शन या सर्व स्तरांवर अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत (इफ्फी) वेव्हज् फिल्म बझारच्या मंचावर ‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि चित्रपट परिसंस्थेतील संधी, विकासाच्या शक्यता आणि भविष्यातील दिशा’ या विषयावर महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्यासह महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक निखिल महाजन, सिनेमॅटोग्राफर व दिग्दर्शक महेश लिमये आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुहृद गोडबोले सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन चित्रपट अभ्यासक-दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे यांनी केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते आणि संस्थांना महाराष्ट्रात सहनिर्मितीसाठी आकर्षित करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची गरज निखिल महाजन यांनी चर्चेत मांडली.
डॉ. किरण कुलकर्णी काय म्हणाले?
यावर सकारात्मक प्रतिसाद देताना डॉ. किरण कुलकर्णी यांनी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अशा सहनिर्मितीसाठी स्वतंत्र व्यवस्था सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक खिडकी प्रणाली कार्यरत आहे. या प्रणालीअंतर्गत निर्मात्यांना सात दिवसांच्या कालमर्यादेत विविध विभागांच्या परवानग्या मिळविण्याची सुविधा उपलब्ध आहे. राज्यभरातील बाह्य चित्रीकरण स्थळांसाठी या व्यवस्थेतून आतापर्यंत सुमारे पाच हजार परवानग्या देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारही प्राप्त झाले असून चित्रीकरणासाठी महाराष्ट्रातील बाह्य स्थळांचा वापर अधिक सुलभ व्हावा आणि निर्मात्यांचा वेळ वाचावा, या दृष्टीने ही व्यवस्था महत्त्वपूर्ण ठरत आहे.
Avinash Mishra-Eisha Singh: टीव्ही अभिनेत्री अभिनेत्री ईशा सिंह आणि खतरो के खिलाडी विजेता अविनाश मिश्रा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा गेल्या काही ...
पुढे बोलतांना, कमी बजेटच्या चित्रपटांच्या निर्मितीबरोबरच त्यांच्या प्रदर्शनाचा आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रश्नही या परिसंवादात चर्चिला गेला. मल्टिप्लेक्समधील वाढते तिकीटदर, चित्रपटांना मिळणाऱ्या मर्यादित प्रदर्शन संधी आणि योग्य वेळेत शो उपलब्ध न होणे यामुळे लहान निर्माते आणि नवोदित दिग्दर्शकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा दिग्दर्शक निखिल महाजन यांनी निदर्शनास आणून दिला. या समस्येची राज्य शासनाने दखल घेतली असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू असून, कमी बजेटच्या चित्रपटांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच सक्षम यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. चित्रपटगृहांमध्ये योग्य वेळेत शो न मिळण्यासह या प्रश्नाचे विविध पैलू लक्षात घेऊन संबंधित विभागांशी समन्वय साधला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्राच्या चित्रपट परिसंस्थेचा विचार करताना राज्याला लाभलेला समृद्ध चित्रपट वारसा, उपलब्ध पायाभूत सुविधा, निर्मितीचा अनुभव आणि बदलत्या काळानुसार आवश्यक असलेले आधुनिकीकरण यांची सांगड घालणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.
प्रशांत साजणीकर
महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी महाराष्ट्राच्या चित्रपट परिसंस्थेचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, बदलत्या काळातील निर्माते आणि प्रेक्षकांच्या गरजांनुसार सुविधा व यंत्रणा विकसित करण्यावर महामंडळाचा भर असल्याचे यावेळी सांगितले. ते म्हणाले की, चित्रपट निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधून त्यांच्या सूचनांच्या आधारे नव्या आव्हानांवर उपाय शोधण्यात येत आहेत. काळानुसार चित्रपट उद्योगाच्या गरजा बदलत आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील अनुभवी दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यानुसार उपाययोजना करणे, ही महामंडळाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट निर्मिती आणि प्रदर्शनातील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शासन आणि चित्रपट उद्योग यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आवश्यक असून त्यादृष्टीने महामंडळ विविध उपक्रम राबवत आहे, अशी माहिती प्रशांत साजणीकर यांनी दिली.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्यक्ष अनुभवातून महाराष्ट्रातील चित्रीकरण स्थळांची क्षमता अधोरेखित करताना महेश लिमये यांनी महाराष्ट्रात अनेक उत्तम लोकेशन्स आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असून, त्यांचा अधिकाधिक वापर होण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, चित्रीकरणासाठी वापरलेल्या स्थळांची स्वच्छता आणि मूळ स्थिती कायम राखणे ही निर्मात्यांची जबाबदारी आहे. एखाद्या निर्मिती संस्थेच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या ठिकाणी चित्रीकरणास नकार मिळाल्यास त्याचा फटका इतर निर्मात्यांनाही बसतो. त्यामुळे चित्रीकरणानंतर स्थळांची योग्य देखभाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दिग्दर्शक निखिल महाजन
आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीच्या माध्यमातून भारतीय चित्रपटांना जागतिक बाजारपेठेत नेण्याची मोठी संधी असून, यासाठी महाराष्ट्र शासनाने आवश्यक प्रक्रिया आणि सहकार्याची यंत्रणा विकसित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.





