
दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबई : आर्थिक अडचणींमुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या सातत्याने घटत असताना, या कारखान्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने अभ्यास समिती स्थापन केली आहे. साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील ही समिती ऊस उत्पादकता आणि साखर उतारा वाढविण्यापासून ते कारखान्यांचे आर्थिक पुनरुज्जीवन, उपपदार्थ निर्मिती आणि साखर उद्योगाच्या आधुनिकीकरणापर्यंत विविध बाबींचा अभ्यास करणार आहे. सहकार विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, समितीला दोन महिन्यांत सविस्तर अहवाल आणि शिफारशी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सन २००० च्या दशकात राज्यात २०० हून अधिक सहकारी साखर कारखाने कार्यरत होते. मात्र, गेल्या २५ वर्षांत प्रत्यक्ष गाळप करणाऱ्या सहकारी कारखान्यांची संख्या १०० च्या आत आली आहे. आर्थिक अडचणींमुळे काही कारखाने अवसायनात गेले, काहींची विक्री झाली, तर काही बंद पडले. सुमारे ३० ते ३२ कारखाने खासगी व्यवस्थापनाकडून भाडेतत्त्वावर किंवा सहयोगी तत्त्वावर चालविले जात आहेत. त्यामुळे स्वबळावर गाळप हंगाम घेणाऱ्या सहकारी कारखान्यांची संख्या सुमारे ७५ वर मर्यादित राहिली आहे. गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय सहकार विकास निगममार्फत (एनसीडीसी) शासन हमीवर ३३ सहकारी कारखान्यांना अर्थसाह्य मिळाले. हे अर्थसाह्य मिळाले नसते, तर कारखान्यांची संख्या आणखी घटली असती. मात्र, या मदतीनंतरही कारखान्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे सुधारलेली नाही. या पार्श्वभूमीवर कारखान्यांच्या अडचणींची कारणमीमांसा करून दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर तेथील उद्ध्वस्त भागांची पुन्हा उभारणी करण्यासाठी आणि नेपाळच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान ...
समितीच्या अध्यक्षपदी साखर आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली असून, सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक, महाराष्ट्र राज्य सहकारी विकास बँकेचे प्रशासक किंवा व्यवस्थापक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे प्रतिनिधी सदस्य असतील. याशिवाय राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, ऊस संशोधन केंद्राचे प्रतिनिधी तसेच ऊस बियाणे निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञांचाही समितीत समावेश आहे. साखर उद्योगातील दोन तज्ज्ञ व्यक्तींची नावे साखर आयुक्त शासनाला सुचविणार आहेत. आवश्यकतेनुसार अन्य तज्ज्ञांना आमंत्रित करण्याचा अधिकारही आयुक्तांना देण्यात आला आहे.
समितीच्या अभ्यासात ऊस विकास, उत्पादकता आणि साखर उतारा वाढविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. दर्जेदार ऊस बियाण्यांची उपलब्धता, बियाणे साखळी आणि ऊती संवर्धन तंत्रज्ञानाचा विकास, बियाणे कायदा १९६६ ची अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रण यांचा अभ्यास केला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), जीपीएस, ड्रोन आणि यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणे, मृदा आरोग्य सुधारणे आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देणे याबाबतही शिफारशी केल्या जाणार आहेत. ऊस पक्वतेनुसार तोडणी, पीक फेरपालट, इथेनॉल निर्मितीसाठी पर्यायी पिकांचा वापर आणि दर्जेदार ऊस उत्पादनासाठी ‘शर्करा आधारित ऊस दर प्रणाली’ लागू करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी समितीवर असेल. गाळप क्षमता आणि गाळप कालावधी यांचा समन्वय साधण्यासाठी नियुक्त अभ्यास गटाचा अहवाल प्राप्त करून त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. झोनबंदीच्या पार्श्वभूमीवर दूरच्या भागातून ऊस आणण्याचे निकष आणि त्यासाठीच्या खर्चाची जबाबदारी निश्चित करण्याचाही अभ्यास होईल. संयुक्त उपसा जलसिंचन योजना आणि ठिबक सिंचनासाठी पाणीपुरवठा पद्धती विकसित करण्याबाबतही विचार केला जाणार आहे.
साखर कारखाने ‘ऊर्जा संकुल’ म्हणून विकसित होणार
साखर उद्योगाला केवळ साखर उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता ‘ऊर्जा संकुल’ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी साखर आयुक्तालयाचा सुधारित आकृतीबंध, आवश्यक पदनिर्मिती आणि प्रशासकीय सक्षमीकरणाबाबत समिती शिफारशी करणार आहे. राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार ‘संकल्प २०४७’ साध्य करण्यासाठी साखर उद्योगाची भूमिका निश्चित करण्याचाही अभ्यास केला जाणार आहे. कारखान्यांच्या उपपदार्थ निर्मितीला चालना देण्यासाठी एकात्मिक बायो-रिफायनरी अर्थात ‘झिरो वेस्ट’ मॉडेल तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी), पहिल्या आणि दुसऱ्या पिढीतील इथेनॉल (१जी आणि २जी), मल्टी-फीड डिस्टिलरी, शाश्वत विमान इंधन (एसएएफ), सहवीज निर्मिती, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन, जैव-रसायने आणि जैव-बिटुमेन अशा दहा प्रकारच्या उपपदार्थांच्या निर्मितीचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून २० टक्के, राज्य सरकारकडून १० टक्के आणि कारखान्याचा ७० टक्के हिस्सा अशा वित्तीय रचनेची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.
आर्थिक शिस्तीसाठी स्वतंत्र कर्जखाती
सहकारी साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन आणि आर्थिक शिस्त हा समितीच्या अभ्यासाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी विकास बँकेच्या मदतीने कारखानानिहाय आर्थिक व्यवहार्यता तपासली जाणार आहे. प्रत्येक गाळप हंगामासाठी स्वतंत्र कॅश क्रेडिट (सीसी) कर्ज खाते ठेवणे आणि त्या हंगामातील कर्जाची पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी परतफेड अनिवार्य करण्याबाबत धोरण निश्चित केले जाणार आहे. एस्क्रो खाते, कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ, कर्जपुरवठा आणि वसुलीचे निकष यांचाही अभ्यास होईल. कारखान्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बाह्य गुंतवणूकदार कंपन्यांचा सहभाग आणि कारखान्यांचा स्वतःचा हिस्सा निश्चित करणे, कर्ज घेतलेल्या कारखान्यांवर देखरेख ठेवणारी यंत्रणा उभारणे आणि पुनरुज्जीवन किंवा पुनर्वसन निधी निर्माण करणे याबाबतही समिती शिफारशी करणार आहे. थकीत कर्जामुळे अडचणीत आलेल्या (एनपीए) सहकारी कारखान्यांसाठी रिझर्व्ह बँकेच्या मदतीने पुनरुज्जीवन आणि कर्जनिराकरण आराखडा तयार करण्याचा विचार आहे. तसेच, एनसीडीसीमार्फत भांडवली सहाय्य देण्याबाबतही धोरण निश्चित केले जाणार आहे.






