पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ‘भोरशा कर्मसूची’ या योजनेअंतर्गत पात्र बेरोजगार तरुणांना दरमहा आर्थिक भत्ता दिला जाणार आहे. जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली. पात्रतेनुसार लाभार्थ्यांना दरमहा 1,500 ते 2,000 रुपये मिळणार आहेत.
कोणाला किती भत्ता मिळणार?
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पदवी नसलेल्या बेरोजगार तरुणांना दरमहा 1,500 रुपये, तर पदवीधर आणि सरकारी व्यावसायिक संस्था तसेच आयटीआयमधून डिप्लोमा मिळवलेल्या पात्र तरुणांना दरमहा 2,000 रुपये भत्ता दिला जाईल.
भाजपच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार, 2028-29 या आर्थिक वर्षापासून या भत्त्याच्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे. त्यानुसार, सध्या 1,500 रुपये मिळणारा भत्ता 2,000 रुपये, तर 2,000 रुपये मिळणारा भत्ता 3,000 रुपये केला जाईल.
या योजनेसाठी अर्जदारांचे वय 21 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. मागील तृणमूल काँग्रेस सरकारच्या ‘युवसथी’ योजनेच्या जागी ही नवी योजना लागू करण्यात येत आहे.
54 लाख लाभार्थ्यांची पडताळणी सुरू
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले की, मागील सरकारच्या योजनेतील सुमारे 54 लाख विद्यमान लाभार्थ्यांची पडताळणी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. योजनेसाठी अद्याप अर्ज न केलेल्या पात्र तरुणांना ‘आपनार सरकार आपनार पाशे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. हे अर्ज युवा कल्याण विभागाकडे पाठवले जातील.
प्रत्येक कुटुंबातील दोन व्यक्तींनाच लाभ
या योजनेचा भत्ता दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात विशेष कार्यक्रमाद्वारे योजनेचे औपचारिक उद्घाटन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरमहा 3,000 रुपयांचा भत्ता मिळणाऱ्या व्यक्तींना या योजनेसाठी पात्र ठरवले जाणार नाही.
बेरोजगार तरुणांना आर्थिक आधार देणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी मिळेपर्यंत मदत करणे, हा या योजनेचा उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.