Monday, November 23, 2026

World Chess Championship 2026: गुकेश की सिंदारोव्ह? बुद्धिबळाच्या पटावर रंगणार दोन युवा चेस मास्टर्सचा महासंग्राम!

आगामी 2026 फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताचा विद्यमान युवा विश्वविजेता डी. गुकेश आणि उझबेकिस्तानचा प्रतिभावान खेळाडू जावोखिर सिंदारोव्ह यांच्यात विजेतेपदासाठी निर्णायक लढत होणार आहे. जागतिक बुद्धिबळातील दोन बलाढ्य देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन्ही तरुण खेळाडूंमधील या प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण क्रीडा जगताचे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

आगामी 2026 फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताचा विद्यमान युवा विश्वविजेता डी. गुकेश आणि उझबेकिस्तानचा प्रतिभावान खेळाडू जावोखिर सिंदारोव्ह यांच्यात विजेतेपदासाठी निर्णायक लढत होणार आहे. जागतिक बुद्धिबळातील दोन बलाढ्य देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन्ही तरुण खेळाडूंमधील या प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण क्रीडा जगताचे विशेष लक्ष वेधले गेले आहे. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे 24  नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 14 क्लासिकल डाव खेळवले जातील. जो खेळाडू सर्वप्रथम 7.5 गुण मिळवेल, तो विश्वविजेता ठरेल. प्रत्येक खेळाडूला पहिल्या 40 चालींसाठी 120 मिनिटे दिली जातील. त्यानंतर उर्वरित खेळासाठी 30 मिनिटे मिळतील. 41व्या चालीपासून प्रत्येक चालीसाठी 30 सेकंदांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. 14 डावांनंतर दोन्ही खेळाडूंचे गुण 7-7 असे समान राहिले, तर 12 डिसेंबरला टाय-ब्रेक खेळवला जाईल. सर्वप्रथम 15 मिनिटांचे चार रॅपिड सामने होतील. प्रत्येक चालीसाठी 10 सेकंदांची वाढ मिळेल.त्यानंतरही बरोबरी राहिल्यास 10 मिनिटांचे दोन सामने होतील. प्रत्येक चालीसाठी 5 सेकंदांची वाढ असेल. तरीही निकाल लागला नाही, तर प्रत्येक खेळाडूला 3 मिनिटे असलेले ब्लिट्झ सामने खेळवले जातील. प्रत्येक चालीसाठी 2 सेकंदांची वाढ मिळेल. अशा प्रकारे विजेता मिळेपर्यंत ब्लिट्झ सामने सुरू राहतील. विशेष म्हणजे, 21 व्या शतकात जन्मलेल्या दोन खेळाडूंमधील ही पहिलीच जागतिक विजेतेपदाची लढत ठरणार आहे. त्यामुळे बुद्धिबळाच्या इतिहासात या सामन्याला विशेष महत्त्व आहे.

गुकेशच्या कामगिरीकडे लक्ष

जागतिक बुद्धिबळ पटलावर भारताचा डी. गुकेश एक बलाढ्य नाव म्हणून उदयास आला आहे. वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब पटकावणाऱ्या गुकेशने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. 2022 आणि 2024 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक सुवर्णपदके जिंकल्यानंतर, त्याने 2024 ची कँडिडेट्स स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम केला. पुढे सिंगापूर येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद लढतीत चीनच्या डिंग लिरेनचा निर्णायक 14व्या डावात पराभव करत, अवघ्या 18व्या वर्षी तो सर्वात तरुण निर्विवाद क्लासिकल विश्वविजेता ठरला. 2000 मध्ये विश्वनाथन आनंद यांनी मिळवून दिलेल्या पहिल्या विश्वविजेतेपदानंतर भारतीय बुद्धिबळाने मोठी झेप घेतली असून, गुकेशच्या या ऐतिहासिक कामगिरीने जागतिक बुद्धिबळातील भारताचे स्थान अधिक भक्कम केले आहे.

सिंदारोव्हचा आत्मविश्वास आणि विजयी फॉर्म

उझबेकिस्तानचा जावोखिर सिंदारोव्ह मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरत आहे. वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर ठरलेल्या सिंदारोव्हने 2025 चा वर्ल्ड कप आणि 2026ची कॅंडिडेट्स स्पर्धा जिंकून इतिहास रचला. जागतिक अजिंक्यपद लढत खेळणारा तो पहिलाच उझबेक खेळाडू असून, सध्या तो विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, गुकेशला कमी लेखून चालणार नाही; विश्वविजेतेपदाचा अनुभव आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता हीच गुकेशची खरी ताकद आहे. आतापर्यंतच्या क्लासिकल सामन्यांमध्ये सिंदारोव्हने गुकेशविरुद्ध 2.5-0.5 अशी आघाडी घेतली आहे.मात्र, या आकडेवारीमुळे सामन्याचा निकाल आधीच ठरत नाही. त्यांचे जुने सामने 2018 आणि 2022  मध्ये झाले होते. त्यानंतर दोघांच्याही खेळात मोठी सुधारणा झाली आहे. 2026 मध्ये झालेल्या टाटा स्टील चेस टूर्नामेंटमधील त्यांची लढत अनिर्णित राहिली होती. त्यामुळे यावेळचा सामना अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. एका बाजूला विश्वविजेतेपदाचा अनुभव असलेला गुकेश, तर दुसऱ्या बाजूला सलग मोठ्या स्पर्धा जिंकणारा सिंदारोव्ह, दोघेही युवा आहेत आणि दोघांकडेही इतिहास घडवण्याची संधी आहे. गुकेशने विजय मिळवला, तर तो पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू असल्याचे सिद्ध करेल. तर सिंदारोव्हने बाजी मारली, तर उझबेकिस्तानला पहिला क्लासिकल विश्वविजेता मिळेल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >