
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असतानाही १७ वर्षांच्या अल्पवयीन मुली प्रसूतीसाठी रुग्णालयात येत असतील, तर ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. बालविवाह रोखण्याची जबाबदारी केवळ शासन, पोलीस किंवा आरोग्य यंत्रणेची नाही. त्यासाठी सर्वप्रथम कुटुंब आणि समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलींचे बालपण हिरावून घेणाऱ्या बालविवाहाच्या प्रथेला समाजातूनच विरोध झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. रहाटकर यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. या वेळी रुग्णालयातील गरोदर माता आणि प्रसूतीसंदर्भातील आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा रुग्णालयातील एकूण गरोदरपणाच्या प्रकरणांपैकी १६ ते १८ टक्के प्रकरणे अतिजोखमीच्या श्रेणीत असल्याची माहिती समोर आली आहे. माता आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. अतिजोखमीच्या गरोदरपणामागील नेमकी कारणे शोधून त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू असतानाही १७ वर्षांच्या मुली प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होत असतील, तर आजही छुप्या पद्धतीने बालविवाह होत असल्याचे स्पष्ट होते. बालविवाहामागील सामाजिक आणि आर्थिक कारणांचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. केवळ कायदे करून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करून ही समस्या संपणार नाही. त्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल घडविणे आवश्यक आहे. अल्पवयात विवाह झाल्याने मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यावर गंभीर परिणाम होतात. लहान वयात मातृत्वाची जबाबदारी आल्याने माता आणि बालकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो, असे रहाटकर यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर (प्रतिनिधी) - शीख धर्माचे प्रथमपातशाही धन धन श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या ५५७ व्या प्रकाश गुरुपुरबचा सोहळा येथील ऐतिहासिक ...
देशाला २०३० पर्यंत शंभर टक्के बालविवाहमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने २०२६ मध्ये बालविवाहाचे प्रमाण किमान दहा टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी शासनाबरोबरच समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तिचा विवाह होऊ नये, तिला शिक्षणाची संधी मिळावी आणि सुरक्षित मातृत्व मिळावे, याची काळजी सर्वप्रथम कुटुंबाने घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाकडून जनजागृती आणि आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम सुरू आहे. मात्र, प्रत्येक वेळी सरकार, पोलीस किंवा रुग्णालयांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. समाज हा कुटुंबांनीच बनलेला असतो. त्यामुळे आपल्या घरातील मुलीचे बालपण सुरक्षित ठेवणे, तिचे शिक्षण पूर्ण होऊ देणे आणि वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तिचा विवाह न करणे, ही जबाबदारी कुटुंबांनी स्वीकारली पाहिजे. बालविवाह रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवी संघटनांनीही पुढाकार घेऊन सक्रिय भूमिका बजावावी. कायद्याच्या धाकापेक्षा समाजातील जाणीव आणि मानसिकतेत बदल घडवून आणल्यासच बालविवाहमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य होईल, असेही रहाटकर यांनी सांगितले.





