Tuesday, November 24, 2026

Buldhana News : सिंदखेडराजात 12 जानेवारीला विशेष मंत्रिमंडळ बैठक घ्या; बुलढाणा जिल्ह्याला ‘जिजाऊनगर’ नाव देण्याची राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘जिजाऊनगर’ करावे, असे दोन महत्त्वाचे ठराव पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले.

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी असलेल्या सिंदखेडराजा येथे 12 जानेवारी 2027 रोजी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली आहे. लोकनेते अजितदादा पवार यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही बैठक घ्यावी, तसेच बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘जिजाऊनगर’ करावे, असे दोन महत्त्वाचे ठराव पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले.

वैशाली नागवडे यांच्या उपस्थितीत तीन ठराव मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील कार्यालयात महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा ग्रामीण महिला पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक आणि विकासाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तीन महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी चौंडी येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन विकासकामांना गती देण्यात आली होती. त्याच धर्तीवर राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी सिंदखेडराजा येथेही 12 जानेवारी 2027 रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. या माध्यमातून परिसराच्या विकासाला चालना मिळावी, अशी भूमिका महिला पदाधिकाऱ्यांनी मांडली.

अजितदादांच्या नावापुढे ‘स्वर्गीय’ शब्द न वापरण्याचा ठराव

बैठकीत मंजूर झालेल्या दुसऱ्या ठरावानुसार, भाषणे, बॅनर आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांच्या नावापुढे ‘स्वर्गीय’ हा शब्द न वापरता केवळ ‘लोकनेते अजितदादा पवार’ असा उल्लेख करण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली.

महिला लोकप्रतिनिधींना जिल्हास्तरीय बैठकीत स्थान देण्याची मागणी

तिसऱ्या ठरावात पक्षाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, सहकारी साखर कारखाने, बँका आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह विविध संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या महिला प्रतिनिधींना पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकांमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्याची मागणी करण्यात आली.

या तिन्ही ठरावांच्या प्रती महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात येणार आहेत.

अजितदादांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार

बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी पाहिलेल्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्पही व्यक्त केला. ‘अजितदादांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवूया, एकजुटीने काम करूया!’ अशा घोषणा देत महिला पदाधिकाऱ्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >