Tuesday, November 24, 2026

Nashik : सिंहस्थ रस्त्यांच्या कामांना ठेकेदारांचा ‘ब्रेक’ ; आयुक्तांचा कारवाईचा इशारा

नाशिक  : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील २९ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून, ती ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, काही ठेकेदारांकडून कामे संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि अन्य संसाधने वाढवून कामांना गती द्यावी. अन्यथा करारातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनामार्फत शहरात रस्ते, पूल, पाणीपुरवठा वाहिन्या, मलनिस्सारण यांसह सुमारे पाच हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. कोट्यवधी भाविक शहरात दाखल होणार असल्याने त्यांच्या वाहतुकीसाठी चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी सुमारे चौदाशे कोटी रुपये खर्चून रस्त्यांची कामे केली जात आहेत. २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले अमृतस्नान होणार असून, त्यापूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. गेल्या वर्षभरापासून रस्त्यांची कामे सुरू असून, ती निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी वेळोवेळी दिल्या आहेत.

मात्र, काही कामांची प्रत्यक्ष प्रगती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत महापालिकेने संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. कामांची गती तातडीने वाढविणे, पुरेसे कुशल व अकुशल मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्री आणि वाहने उपलब्ध करणे, तसेच दैनंदिन कामांचे उद्दिष्ट निश्चित करून युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३१ मार्च २०२७ पर्यंत कामे पूर्ण करणे बंधनकारक असून, कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे नोटिसांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

रस्त्यांच्या कामांची प्रगती

मक्तेदार रस्त्याचे काम अपेक्षित प्रगती प्रत्यक्ष प्रगती
डी. सी. अजमेरा खडकाळी ते आयटीआय सिग्नल ६५ टक्के ४० टक्के
टी ॲण्ड टी इन्फ्रा त्र्यंबक नाका ते मुंबई नाका ५५ टक्के ३३ टक्के
पवार-पाटकर कन्स्ट्रक्शन महात्मानगर ६६ टक्के ५८ टक्के
 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >