Tuesday, November 24, 2026

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर शुभमन गिलने ठेवलेला प्रस्ताव आयसीसीने फेटाळला, असं कारण दिलं की...

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या हातून विजयाची संधी गेली. गोलंदाजांना न्यूझीलंडच्या विकेट काढण्यात अपयश आलं. त्यानंतर शुभमन गिलने आयसीसीकडे एक मागणी केली होती. त्या मागणीला आयसीसीने एक कारण देत केराची टोपली दाखवली आहे.

भारत न्यूझीलंड कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना अनिर्णित ठरला. पहिल्या सामन्यात भारताने 720 धावांचा डोंगर रचला होता. मात्र न्यूझीलंडचे विकेट काढण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं. चौथ्या आणि पाचव्या दिवसाचा खेळ शिल्लक असताना भारतीय गोलंदाजांना अपयश आलं. त्यामुळे सपाट खेळपट्टीवरून बरीच टीका झाली. गोलंदाजांना पूरक अशी खेळपट्टी नसल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला. असं असताना कर्णधार शुभमन गिलने गोलंदाजांना पुन्हा लाळेचा वापर करू द्यावा, अशी मागणी केली. मात्र आयसीसीने त्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. लाळ वापरण्याची बंदी मागे घेण्याचा कोणताही विचार नसल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. वेलिंग्टन बेसिन रिझर्व्ह येथील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर गिलने तक्रारींचा पाढा वाचला होता. इतकंच काय तर कुकाबुरा चेंडू लवकर नरम होतो आणि गोलंदाजांना मदत व्हावी म्हणून लाळेचा वापर करू द्याव अशी मागणी केली. पण या मागणीवर आयसीसीने थेट नकार दर्शवला आहे.

आयसीसीने का घातली होती बंदी?

कोरोना काळात क्रिकेट खेळताना बरीच बंधनं लादली गेली होती. कालांतराने कोरोनाचा जोर ओसरला आणि बंधनं शिथिल होत गेली. कोरोना काळात आयसीसीने चेंडूला शाईन करण्यासाठी लाळेचा वापर करण्यास बंदी घातली होती. मात्र ही बंदी कोरोना ओसरल्यानंतरही कामय ठेवण्यात आली. मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या नियमानुसार, चेंडूची स्थिती बदलण्याच्या इतर कोणत्याही अयोग्य साधनांप्रमाणेच लाळ एक आहे. लाळ ही मिठाई, च्युइंग गम आणि मिंट्स यांसारख्या पदार्थांसोबत मिसळल्यास चेंडूची स्थिती लक्षणीयरीत्या बदलू शकते. त्यामुळे लाळेच्या वापराचे निरीक्षण करणे आणि नियमन करणे खूप कठीण होते.

लाळ खेळाडूंसाठी धोकादायक

आयसीसीच्या मते, लाळेच्या वापरामुळे खेळाडू, पंच आणि सामन्यात निगडीत असलेल्यांना धोका होऊ शकतो. युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलनुसार, नव्याने उदयास येणारे SARS-CoV-2 चे प्रकार आरोग्यासाठी घातक आहे. लाळेच्या माध्यमातून त्याचा प्रसार होऊ शकतो.

लाळेमुळे काय होतं?

  • गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या फक्त एकाच बाजूला लाळ लावून पँटवर घासतात. यामुळे चेंडूची ती बाजू गुळगुळीत आणि चमकदार राहते, तर दुसरी बाजू खेळपट्टीवर आदळून खडबडीत होते.
  • चेंडूची एक बाजू गुळगुळीत आणि दुसरी बाजू खडबडीत झाल्यामुळे चेंडू हवेतून जाताना दोन्ही बाजूंना हवेचा दाब वेगवेगळा असतो. या फरकामुळे चेंडू स्विंग होतो आणि फलंदाजाला चकवा देणे सोपे जाते.
  • लाळ ही घामापेक्षा थोडी जड आणि चिकट असते . चेंडूच्या एका बाजूला सतत लाळ लावल्यामुळे ती बाजू दुसऱ्या बाजूच्या तुलनेत जड होते. चेंडू जुना झाल्यावर या वजनाच्या आणि पृष्ठभागाच्या फरकामुळे वेगवान गोलंदाजांना चेंडू उलट दिशेने वळवता म्हणजेच 'रिव्हर्स स्विंग' करता येतो.
  • थंड वातावरणात खेळाडूंना पुरेसा घाम येत नाही. तसेच, चेंडू घाम जास्त शोषून घेतो, ज्यामुळे चेंडू मऊ पडतो आणि त्याची उसळी कमी होते. याउलट, लाळ चेंडूला मऊ न करता आवश्यक ओलावा आणि जडपणा देते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >