Prahaar Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
शहरातील नागरिकांना गुरुवारी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत निगडी येथील सेक्टर क्रमांक २३ जलशुद्धीकरण केंद्रासह क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कामांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थेतील स्थापत्य आणि विद्युत विषयक दुरुस्तीचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी पूर्णपणे बंद राहणार आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भागांतील नागरिकांना गुरुवारी पाणी मिळणार नाही. दरम्यान, शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळचा पाणीपुरवठा उशिराने, कमी दाबाने किंवा अनियमित होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.त्यामुळे नागरिकांनी गुरुवारच्या पाणीपुरवठा बंदच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Prahaar Marathi News Live Updates : मतदार यादीत नाव नसलेल्यांना पुन्हा संधी; ३० नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्र भरण्याची मुदत
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव न आलेल्या पात्र नागरिकांसाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा गणना प्रपत्र (Enumeration Form) भरण्याची संधी दिली आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार (ASDD) प्रवर्गासाठी प्रपत्र वितरण व संकलनाची मुदत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झाल्या असून, नाव नसलेल्यांची यादी मुख्य/जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाइट्सवर तसेच मतदान केंद्रांवर उपलब्ध आहे. पात्र नागरिक BLO मार्फत किंवा ECINET ॲपवर E-sign द्वारे ऑनलाइन पद्धतीने नव्याने गणना प्रपत्र भरून नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात.
Prahaar Marathi News Live Updates : आयओए निवडणुकीसाठी पीटी उषा यांचा उमेदवारी अर्ज नाही
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पीटी उषा यांनी 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या आयओए कार्यकारी समितीच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. मंगळवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. नुकत्याच पार पडलेल्या 'गुणवंत खेळाडू' निवडणुकीत महिला गटातून पीटी उषा यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत अंजू बॉबी जॉर्ज (53 मते), राणी रामपाल (50 मते), डोला बॅनर्जी (45 मते) आणि सायना नेहवाल (43 मते) या निवडून आल्या होत्या, तर उषा यांना 40 मते मिळाली होती. या धक्क्यानंतरही, या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय आइस हॉकी महासंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक मंडळात नामांकन मिळाल्याने त्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत कायम होत्या. मात्र, अखेरच्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल न केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Prahaar Marathi News Live Updates : UAE ला धूळ चारत भारताची उपांत्य फेरीत एन्ट्री; वैभव सूर्यवंशीचा 204 धावांचा धमाका
दोहा येथे झालेल्या यूएई विरुद्ध भारत या सामन्यात भारताने आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या उपांत्य भेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. सात गडी राखत भारताने यूएईवर (India vs UAE) मात केली आहे. युएईने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 249 धावा केल्या आणि विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना वैभव सूर्यवंशीने युएईच्या गोलंदाजांना फोडून काढलं.त्याने एकट्याने 200हून अधिक धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. वैभव सूर्यवंशीने 53 चेंडूत 7 चौकार आणि 28 षटकार मारून 204 धावांची खेळी केली आणि भारताच्या विजयात योगदान दिलं. खरं तर हा सामना त्याने एकट्याने खेळला असं म्हणायला हरकत नाही. कारण 250 पैकी 204 धावा या एकट्या वैभव सूर्यवंशीने कुटल्या. म्हणजेच भारताच्या इतर फलंदाजांच्या वाटेला फक्त 46 धावा आल्या.
Prahaar Marathi News Live Updates : अमित शाहांची मोठी घोषणा; पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल एकत्र मैदानात
Prahaar Marathi News Live Updates : पंजाब विधानसभेसाठी भाजप आणि अकाली दल एकत्र; गृहमंत्री अमित शाह यांनी केली घोषणा
पंजाब विधानसभेसाठी भाजप आणि अकाली दल एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आज (२४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भात माहिती दिली. जवळपास ६ वर्षांनंतर पुन्हा अकाली दल आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार आहे. पंजाबमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Prahaar Marathi News Live Updates : पंचवटी एक्सप्रेसखाली येऊन मामा-भाचा गंभीर जखमी
नाशिक : पंचवटी एक्सप्रेसखाली येऊन मामा आणि भाचा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे. या भीषण अपघातात १२ वर्षीय भाच्याला आपला पाय गमवावा लागला असून, मामाच्या हाताची चार बोटे तुटली आहेत. प्रवासादरम्यान भाचा लघुशंकेसाठी खाली उतरला असताना अचानक रेल्वे गाडी सुरू झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान दोघांनाही तात्काळ उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आहेत.
Prahaar Marathi News Live Updates: आगरा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ट्रकने शाळेच्या बसला धडक दिली, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू
कन्नौज येथील आगरा-लखनऊ एक्सप्रेसवेवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. आगरा फिरून कन्नौजला परतत असलेल्या शाळेच्या बसला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक मुले जखमी झाली आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश पसरला.
Prahaar Marathi News Live Updates: कुर्ला येथील महाजन उद्यानात तरुण-तरुणीला मारहाण; मानवाधिकार आयोगाने घेतली दखल
कुर्ला येथील महाजन उद्यानात एका तरुण-तरुणीला अल्पवयीन टोळक्याकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून, पोलिसांकडून याप्रकरणी सविस्तर अहवाल मागवला आहे. मारहाणीमागील नेमके कारण आणि संबंधित अल्पवयीन मुलांवर काय कारवाई झाली, याची माहिती आयोगाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Prahaar Marathi News Live Updates: बिहारमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास बिहारमधील समस्तीपूर येथे भूकंपाचे धक्के जाणवले. दोन सेकंदासाठी हे भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. समस्तीपूरमध्ये अनेक वर्षांत पहिल्यांदाच भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्याचे कळाले नाही, परंतू अवघ्या काही सेकंदाच्या ह्या निर्णयामुळे मात्र नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
Prahaar Marathi News Live Updates: ग्रेटर नोएडामध्ये सिलिंडर स्फोटात चिमुकल्यासह अख्खं कुटुंब आगीत होरपळले
उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडातील दयानतपूर गावात सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेमुळे ग्रेटर नोएडा शहर हादरलं आहे. अत्यंत हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लग्नाच्या आनंदाचे क्षण अवघ्या काही वेळामध्ये भयान शांततेमध्ये बदलले आहे. घरातील गॅस सिलिंडरमधून अचानक वायू गळती झाल्यानंतर लागलेल्या आगीत आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. या भीषण दुर्घटनेत बाप- लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन वर्षांच्या चिमुकल्यासह दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
Prahaar Marathi News Live Updates: २०० कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई; जुहूतील रहिवासी धर्मेंद्र सिंहला अटक
२०० कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी मुंबईतील जुहू परिसरात राहणाऱ्या धर्मेंद्र सिंह याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि त्यामागील इतर संबंधित बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
Prahaar Marathi News Live Updates: मुंबईकरांनो लक्ष द्या! २६ नोव्हेंबरला २४ तास पाणीपुरवठा बंद; धारावी ते भांडुपपर्यंत अनेक भागांना फटका
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील काही भागांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. धारावीपासून भांडुपपर्यंतच्या विविध परिसरांना या पाणी कपातीचा फटका बसणार आहे. महापालिकेकडून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Prahaar Marathi News Live Updates: WhatsApp Web वापरणाऱ्यांसाठी सरकारचा सायबर अलर्ट! हॅकर्सकडून अकाउंट हायजॅक होण्याचा धोका
WhatsApp Web वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या सायबर गुन्हे विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. २३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या सुरक्षा सूचनेनुसार, WhatsApp Web चे सक्रिय लॉगिन हॅकर्ससाठी धोक्याचे ठरू शकते. याच्या माध्यमातून हॅकर्स खासगी चॅट वाचणे, कॉन्टॅक्ट लिस्ट पाहणे आणि संबंधित व्यक्तीच्या नावाने इतरांना मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे वापरकर्त्यांनी WhatsApp Web वापरताना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.