
Sheikh Hasina : बांगलादेशच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आता मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी १६ डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. तसेच दिल्लीहून ढाका येथे परतण्यासाठी बांगलादेश सरकारने सरकारी विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, बांगलादेशात परतताच त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्ली ते ढाका प्रवासासाठी मागितले सरकारी विमान
शेख हसीना यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ डिसेंबर रोजी बांगलादेशच्या विजय दिनानिमित्त हसीना मायदेशी परतू इच्छितात. १९७१ मध्ये याच दिवशी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याचा शेवट झाला होता. विशेष म्हणजे, ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना बांगलादेशच्या लष्करी विमानातून भारतात आल्या होत्या. आता त्याच पद्धतीने बांगलादेश सरकारने दिल्ली ते ढाका प्रवासासाठी विमान उपलब्ध करून द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. आपल्या मायदेशी परतण्याची निश्चित तारीख जाहीर करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, शेख हसीना यांनी दिल्लीतील बांगलादेश दूतावासाकडे नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र अर्थात एनआयडी जारी करण्याची मागणीही केली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांनी देश सोडल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचा जुना पासपोर्ट आणि ओळखपत्र रद्द करण्यात आले होते. त्यातच त्यांच्या अवामी लीग पक्षावरही बंदी घालण्यात आली आहे.
90 च्या दशकातील अनेकांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेले लोकप्रिय शीतपेय म्हणजे 'गोल्ड स्पॉट'. एकेकाळी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांमध्ये ...
बांगलादेशात पाऊल ठेवताच अटकेची शक्यता
मात्र, शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या निर्णयासमोर मोठे कायदेशीर आव्हान आहे. बांगलादेश सरकारने त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. बांगलादेशच्या एका मंत्र्याने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, हसीना देशात परतल्यास त्यांना अटक करून तुरुंगात पाठवले जाईल. तसेच त्यांना भारतातून आणण्यासाठी विमान पाठवण्याबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
यामागचे कारण म्हणजे नोव्हेंबर २०२५ मध्ये बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. जुलै २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांविरोधात हिंसक कारवाईचे आदेश दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, शेख हसीना यांनी हे आरोप फेटाळले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, या हिंसाचारात सुमारे १ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता १६ डिसेंबरला शेख हसीना खरोखरच बांगलादेशात परतणार का ? आणि परतल्यास त्यांना अटक होणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.





