
PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेचे २४ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता सर्वांचे लक्ष २५व्या हप्त्याकडे लागले आहे. मात्र, त्याआधीच Farmer ID अर्थात फार्मर आयडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नव्याने योजनेत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
१९ राज्यांमध्ये नवीन नोंदणीसाठी Farmer ID अनिवार्य
केंद्र सरकारकडून एग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी तयार केली जात आहे. या ओळखपत्रामध्ये शेतकऱ्यांची जमीन, शेती आणि इतर आवश्यक माहिती एकाच ठिकाणी नोंदवली जाते. सरकारी योजनांचा लाभ योग्य आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
कृषी मंत्रालयाने मार्च २०२६ मध्ये लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, देशातील १९ राज्यांमध्ये पीएम किसान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, ज्या राज्यांमध्ये अद्याप फार्मर रजिस्ट्रीची प्रक्रिया सुरू झालेली नाही, तिथे शेतकऱ्यांना या आयडीशिवायही नवीन नोंदणी करता येऊ शकते.
नागपूर: नागपूर शहरामध्ये करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यामध्ये करण्यात आला आहे. घडलेल्या ...
आधीपासून लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ?
फार्मर आयडी नसल्यामुळे पीएम किसान योजनेचा २५वा हप्ता बंद होणार, अशी भीती अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे. मात्र, आधीपासून या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ फार्मर आयडी नसल्याच्या कारणावरून हप्ता मिळणार नाही, असा निष्कर्ष काढण्याची गरज नाही. हा नियम प्रामुख्याने नवीन नोंदणीशी संबंधित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या राज्यातील लागू नियम तपासून घ्यावेत.
घरबसल्या कशी बनवता येईल Farmer ID ?
शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करण्यासाठी मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करता येते. तसेच जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करता येते. याशिवाय ब्लॉक किंवा तहसील स्तरावरील सरकारी कार्यालयांची मदत घेता येते.
नोंदणी करताना शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती आणि जमिनीच्या नोंदी तपासल्या जातात. आधार कार्ड, जमीन कागदपत्रे आणि इतर सरकारी दस्तऐवजांमधील नावात तफावत असल्यास नोंदणी करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व कागदपत्रांमधील माहिती योग्य असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
२५वा हप्ता मिळवण्यासाठी 'या' गोष्टी तपासा
पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण असणे आवश्यक आहे.
जमिनीच्या नोंदी पीएम किसान पोर्टलवर अपडेट असाव्यात.
बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
नोंदणीतील वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा तपशील योग्य असावा.
यापैकी कोणत्याही प्रक्रियेत त्रुटी असल्यास हप्त्याची रक्कम अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 'Know Your Status' या पर्यायाद्वारे आपल्या अर्जाची आणि हप्त्याची स्थिती तपासून घ्यावी. दरम्यान, पीएम किसान योजनेचा २५वा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.





