Nashik Crime : शेअर बाजारात कमी पैशांतून मोठा नफा कमावण्याची संधी शोधत असाल, तर सावध व्हा! सायबर भामट्यांनी आता शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचा नवा मार्ग शोधला आहे. ५०० पट मार्जिन आणि करमुक्त ट्रेडिंगचे आकर्षक आमिष दाखवून नाशिकमधील एका गुंतवणूकदाराला तब्बल ५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, फसवणूक करण्यासाठी गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध असलेल्या बनावट ॲपचा वापर करण्यात आला. या प्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी 'ट्रेड बाजार' या नावाने बनावट वेबसाइट आणि अँड्रॉइड ॲप तयार केले होते. हे ॲप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध असल्याने गुंतवणूकदारांचा त्यावर विश्वास बसत होता. त्यानंतर व्हॉट्सॲप आणि ई-मेलच्या माध्यमातून गुंतवणूकदारांशी संपर्क साधला जात होता. कोणताही कर न भरता शेअर ट्रेडिंग करता येईल, तसेच गुंतवलेल्या रकमेच्या ५०० पट मार्जिन मिळेल, असे प्रलोभन दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडून नाशिकमधील एका गुंतवणूकदाराने २ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ५ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. ही रक्कम सुरत डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतील खात्यावर जमा करण्यात आली.
Lured by the promise of 500x margin and tax-free trading, an investor from Nashik gets swindled out of 5 lakh online
बनावट ॲपवर दाखवला नफ्याचा आभास
या फसवणुकीत संशयितांनी अत्यंत शिताफीने बनावट ट्रेडिंग यंत्रणेचा वापर केला. प्रत्यक्षात कोणत्याही अधिकृत स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार न करता केवळ ॲपवर इलेक्ट्रॉनिक नोंदी दाखवून गुंतवणूकदाराला नफा होत असल्याचा भास निर्माण करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात गुंतवलेली रक्कम परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली.
याप्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'ट्रेड बाजार लिमिटेड' या ॲप डेव्हलपरसह सात संशयित व्हॉट्सॲप क्रमांक, ई-मेल आयडी आणि सुरतमधील बँक खातेधारकाचा तपासात समावेश आहे. भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि रोखे करार (नियमन) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक; पोलिसांचा सावधगिरीचा इशारा
दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाइन गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सेबीची नोंदणी नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. ५०० पट मार्जिन किंवा करमुक्त ट्रेडिंगसारखी अवास्तव आश्वासने देणाऱ्या योजनांवर विश्वास ठेवू नये. गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध असलेले प्रत्येक फायनान्स ॲप अधिकृत किंवा सुरक्षित असेलच असे नाही. त्यामुळे कोणत्याही ॲपमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी संबंधित कंपनीची सेबीच्या अधिकृत संकेतस्थळावर पडताळणी करावी. तसेच अनोळखी बँक खात्यांमध्ये पैसे पाठवणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.