Thursday, November 26, 2026

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईची धमाकेदार आगेकूच! 7 सामन्यांत 6 वा विजय; पुदुचेरी-हरियाणाचा थरार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईने उत्तराखंडवर 86 धावांनी दणदणीत विजय मिळवत गटात अव्वल स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे, कर्नाटक, पुदुचेरी आणि हरियाणा यांनीही आपापल्या सामन्यांत दमदार विजयाची नोंद केली.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईच्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत उत्तराखंडचा 86 धावांनी धुव्वा उडवला. मुशीर खानच्या 40 चेंडूंतील 65 धावा, अंगक्रिश रघुवंशीच्या 51 धावा आणि हार्दिक तामोरच्या 14 चेंडूंतील 39 धावांच्या जोरावर मुंबईने शेवटच्या षटकात 209 धावांपर्यंत मजल मारली. उत्तराखंडकडून रवींद्र नेगी आणि जगदीश सुचित यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तराखंडची सुरुवात गडगडली आणि त्यांनी 58 धावांत 5 विकेट्स गमावल्या. शशवत डांगवालने 20 चेंडूंमध्ये 37 तर जगदीश सुचितने 19 धावा केल्या; मात्र अथर्व अंकोलेकरने 17 धावांत 3 बळी घेत उत्तराखंडचा डाव 16.5 षटकांत 123 धावांवर गुंडाळला. 7 सामन्यांतील हा मुंबईचा 6 वा विजय असून 1 सामना पावसामुळे रद्द झाला होता. या कामगिरीसह मुंबईने 'ड' गटात अव्वल स्थान पक्के केले आहे. इतर सामन्यांमध्ये कर्नाटकने गोलंदाजीच्या जोरावर बडोद्याला 8 गडी राखून हरवले. बडोदाचा संघ 118 धावांत गारद झाला; श्रीशा आचार आणि विद्वत कावेरप्पा यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले, तर ध्रुव पटेल (33) आणि शशवत रावत (31) यांनी काहीसा प्रतिकार केला. प्रत्युत्तरात रोहन पाटील (48), कृष्णन श्रीजीत (33) आणि करुण नायरच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर कर्नाटकने 16.1 षटकांत 23 चेंडू राखून विजय मिळवला.

पुदुचेरीने मध्य प्रदेशवर 2 गडी राखून रोमांचक मात करत 158 धावांचे लक्ष्य 2 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. मध्य प्रदेशकडून हर्ष गवळीने नाबाद 72 धावा केल्या, तर प्रणय सिंगने 29 धावांत 4 बळी घेतले. पुदुचेरीकडून परमेश्वरन शिवरामन (नाबाद 46), गौतम दिलीप शास्त्री (35) आणि वेदांत भारद्वाज (26) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. शिवांग कुमारचे 3 बळी मध्य प्रदेशला वाचवू शकले नाहीत आणि सलग 2 पराभवांसह त्यांचा गट फेरीतील प्रवास संपला. हरियाणाने जम्मू आणि काश्मीरचा 2 गडी राखून पराभव करत त्यांची सलग 3 विजयांची मालिका खंडित केली. अब्दुल समदच्या 45 चेंडूंतील नाबाद 77 धावांच्या (6 षटकार) जोरावर जम्मू आणि काश्मीरने 9 बाद 167 धावा केल्या; कनिष्क चौहानने 10 धावांत 3 बळी घेतले. हरियाणाला यशवर्धन दलाल (38), कर्णधार अंकित कुमार (35) आणि राहुल तेवतियाच्या 10 चेंडूंतील नाबाद 20 धावांनी विजय मिळवून दिला. वंश शर्माने 4 गडी बाद केले तरी हरियाणाने 8 गडी गमावून लक्ष्य गाठले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >