
भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका तरुणीने पहिल्यांदाच भारतीय रेल्वेतून, विशेषतः वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. स्वच्छता, आरामदायक आसने, दर्जेदार सेवा आणि चविष्ट जेवण पाहून ती थक्क झाल्याचे या व्हिडिओत दिसून येते. तिचा हा प्रतिक्रिया व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यावर भारतीय नेटकऱ्यांकडून अभिमानाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्हिडिओची सुरुवात रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून होते, जिथे चकचकीत वंदे भारत एक्सप्रेस उभी असल्याचे पाहायला मिळते. पोलंडच्या डोमी पाटलस हिने या व्हिडिओला "भारतातील पोलिश मुलगी. भारतीय रेल्वे प्रवासाचा पहिला अनुभव." असे कॅप्शन दिले आहे. पांढरा टी-शर्ट आणि पाठीवर बॅकपॅक घेऊन ती हसतमुखाने ट्रेनमध्ये चढते. आत गेल्यावर स्वच्छ निळ्या रंगाची आसने, सामान ठेवण्याची व्यवस्थित सोय आणि चमकणारा डबा पाहून तिला मोठा आनंद होतो. सीटवर बसल्यानंतर खिडकीतून दिसणारी शेते, झाडे आणि गावे पाहून ती कॅमेऱ्याकडे पाहून विजयाचे चिन्ह दाखवते.
मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील ...
या प्रवासात डोमीला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे ट्रेनमधील जेवण. सुरुवातीला अटेंडंटने प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या दिल्या. त्यानंतर केशरी रंगाच्या ट्रेमधून मसाला चहा आणि बिस्किटे देण्यात आली. पुढे पूर्णपणे शाकाहारी जेवण सर्व्ह करण्यात आले, ज्यामध्ये पोहे, वेरका योगर्ट, ब्रेड रोल्स, फनकप केक आणि इतर स्नॅक्सचा समावेश होता. डोमीने प्रत्येक पदार्थ कॅमेऱ्यासमोर दाखवला; तिला पोहे आणि योगर्ट हे पदार्थ वेगळे आणि नवीन वाटले. प्रवास संपवून हुडी परिधान करून स्टेशनवर उतरतानाही तिच्या चेहऱ्यावरील हसू कायम होते.
View this post on Instagram
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर भारतीय युजर्सनी आनंद व्यक्त केला आहे. जगाला आपली वंदे भारत आवडत असल्याचे सांगत एका युजर्सने हाच नवा भारत असल्याचे म्हटले आहे. पोलंडहून आलेली तरुणी आपल्या ट्रेनचे कौतुक करत असल्याने मन भरून आल्याची भावना दुसऱ्या युजर्सने व्यक्त केली, तर काहींनी वंदे भारतने युरोपियन ट्रेन्सनाही मागे टाकल्याचे म्हटले आहे.
स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वात आधुनिक गाड्यांपैकी एक मानली जाते. विमानासारख्या सोयीसुविधा, आरामदायक सीट्स, 160 kmph पर्यंतचा वेग, स्वयंचलित दरवाजे, CCTV, स्वच्छ स्वच्छतागृहे आणि जागेवरच मिळणारे जेवण यामुळे ही ट्रेन प्रवाशांची पसंती ठरत आहे. त्यामुळेच परदेशी पर्यटकही आता वंदे भारतने प्रवास करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.





