Wednesday, November 25, 2026

Chiplun Crime Updates: चिपळूणमध्ये कोयत्याने हल्ला करणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद; उर्वरित पाच जणांचा शोध सुरू

चिपळूणमध्ये दोन गटांतील वादातून कोयता हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून, पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे. હल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात भरदिवसा घडलेल्या कोयता हल्ल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोन गटांमधील वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून, या प्रकरणातील सात संशयितांपैकी दोघांना ताब्यात घेण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे. अब्दुल शेख आणि अमन शेख अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर उर्वरित पाच जणांचा शोध सुरू आहे.(Chiplun)

दोन गटांतील वादाचे हाणामारीत रूपांतर

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण शहरातील एन्रॉन पुलाखाली दोन कुटुंबांतील व्यक्ती एकत्र आल्या होत्या. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. या वादादरम्यान काही जणांनी कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हल्ल्यात तिघेजण जखमी

या घटनेत फैजान चौगुले (वय 28) आणि सौद चौगुले (वय 25) यांच्यासह एकूण तिघेजण जखमी झाले आहेत. घटनेनंतर जखमींना तातडीने चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये काही महिला वाद थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असल्याचे वृत्त आहे.(Crime News)

मुंबईच्या दिशेने जाताना दोघांना पकडले

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील सात जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अब्दुल शेख आणि अमन शेख या दोघांना मुंबईच्या दिशेने जात असताना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर उर्वरित पाच जणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.(Ratnagiri Police)

हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट

या घटनेमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, दोन कुटुंबांमधील वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हल्ल्यामागे कौटुंबिक वाद होता की अन्य काही कारण, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे चिपळूणमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.(Koyta Attack)

सध्या या प्रकरणातील दोन जण पोलिसांच्या ताब्यात असून, फरार असलेल्या अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे. तपासातून या घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >