
हैदराबादमध्ये गुरुवारी एका प्रशिक्षण विमानाला फोर्स लँडिंग करावं लागलं. तेलंगणा राज्य विमानन अकादमीचं (Telangana State Aviation Academy) Cessna 152 (VT-YOU) हे विमान गोलकोंडा येथील आर्मी कँटोन्मेंट परिसरात उतरलं आणि एका झाडावर जाऊन अडकलं. या विमानात त्यावेळी एक विद्यार्थी पायलट आणि एक प्रशिक्षक होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेत विद्यार्थी पायलटच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी आर्मी रुग्णालयात नेण्यात आलं असून त्याला टाके घालण्यात आले आहेत. तर प्रशिक्षक सुखरूप असल्याचं सांगण्यात येत आहे. या फोर्स लँडिंगमागची नेमकी कारणं काय होती, याची चौकशी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाली असून ते तपास करत आहेत. पोलीस अधिकारी आणि आर्मी अधिकारी यांच्यात समन्वय सुरू आहे. “आम्हाला या घटनेची माहिती मिळाली आहे. आम्ही माहितीची खातरजमा करत आहोत आणि आर्मी अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. अधिक माहिती नंतर देऊ,” असं एका पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्था ANI ला सांगितलं.
या घटनेबाबत आणखी सविस्तर माहिती मिळणं बाकी आहे.






