
पनवेल: यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शहरासह अनेक गावा-खेड्यांमध्ये सर्वत्रच पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. चालू वर्षी राज्यामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे अनेक भागातील धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल महानगर पालिकेने शहरामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यासाठी बरेच दिवस शिल्लक असताना तोच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.
धरणातील घटता पाणीसाठा लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेने (PMC) पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून या कपातीला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून, वेगवेगळ्या भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र, रविवारी संपूर्ण शहरात नियमित पाणी पुरवठा सुरू राहील. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन आणि 9 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार हे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला दिवाळीपूर्वीच पाणीकपात लागू करण्याचा विचार होता, मात्र लोकप्रतिनिधींच्या विनंतीवरून ती सणानंतर सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी पनवेलमध्ये 25 मे पासून अशी कपात लागू झाली होती; पण यंदा अनेक महिने आधीच पाणीकपात सुरू झाल्याने आगामी उन्हाळ्यात मोठे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पनवेल महापालिकेचे पाणीकपातीचे वेळापत्रक
- सोमवार: मार्केट यार्ड व भाजी मार्केट उंच टाक्या आणि चोखानी जलशुद्धीकरण केंद्र बंद राहील. याचा परिणाम माणिक नगर, अशोका गार्डन, केशवबाग, पटेल पार्क, जैन मंदिर, गणपती मंदिर, मामलेदार कचेरी, सातवली, विश्वकर्मा मंदिर, सिटी स्टोअर्स, पंचायत समिती, कोहिनूर टेक्निकल आणि लक्ष्मी वसाहत आदी भागांवर होईल.
- मंगळवार: पटेल मोहल्ला आणि पायोनियर सोसायटी उंच टाक्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात कपात राहील.
- बुधवार: एचओसी (HOC) उंच टाकीवरून पाणीपुरवठा होणारा संपूर्ण परिसर २४ तास बंद राहील.
- गुरुवार: ठाणा नाका उंच टाकी बंद राहिल्याने साई नगर भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होईल.
- शुक्रवार: गोल टँक जलशुद्धीकरण केंद्र बंद राहून मिडल क्लास हौसिंग सोसायटी (फेज १ आणि २) तसेच एसके बजाज परिसरावर परिणाम होईल.
- शनिवार: गंगाराम सिनेमा उंच टाकीवरून पाणीपुरवठा होणारे तक्का गाव आणि कॉलनी येथे पाणीकपात असेल.
पनवेलची दैनंदिन पाण्याची गरज सुमारे 41 एमएलडी (MLD) इतकी आहे. यापैकी 16 एमएलडी पाणी अप्पासाहेब वेडक (देहरंग) धरणातून आणि उर्वरित 25 एमएलडी पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (MJP) सोडण्यात येते. आधीच काही भागांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असताना या नियोजित कपातीमुळे नागरिकांना पाण्यासाठी ताण वाढणार आहे. उपलब्ध साठ्यानुसार वेळापत्रकात बदल होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सिडकोच्या नोड्सवरही पाणीकपात
या पाणीसंकटाचा फटका सिडकोच्या (CIDCO) अखत्यारीत येणाऱ्या परिसरांनाही बसला आहे. नोव्हेंबरपासून या नोड्समध्ये 15 टक्के पाणीकपात आणि साप्ताहिक 24 तासांचे शटडाऊन सुरू आहे. सिडकोला 361 एमएलडी गरजेच्या तुलनेत केवळ 311 एमएलडी पाणी मिळत असून, तब्बल 50 एमएलडीची तूट आहे. या वेळापत्रकानुसार सोमवारी खारघर आणि नवीन पनवेल पूर्व, मंगळवारी नवीन पनवेल पश्चिम आणि उलवेमधील ठराविक सेक्टर, बुधवारी कळंबोली, गुरुवारी करंजाडे, तर शुक्रवारी तळोजा, कळुंद्रे आणि कामोठे येथे पाणीकपात राहील. पनवेल महापालिका आणि सिडको अशा दोन्ही यंत्रणांच्या स्वतंत्र वेळापत्रकांमुळे संपूर्ण पनवेल पट्ट्यात सध्या पाणीकपातीचे नियोजन लागू झाले आहे,






