वाहनांच्या प्रलंबित ई-चलान दंडात २० टक्के सूट

१ डिसेंबरपासून अभय योजना; तीन टप्प्यांत वर्षभर संधी; जुन्या चलानांसाठी ३० दिवसांची मुदत

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रलंबित असलेल्या ई-चलानच्या दंडाची वसुली करण्यासाठी राज्य सरकारने वाहनधारकांना २० टक्के सवलतीची संधी दिली आहे. ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ येत्या १ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात लागू होणार असून, तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत जुन्या आणि नव्या पात्र चलानांवर सवलत मिळणार आहे. २१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२६ या काळात बजावलेल्या आणि प्रलंबित असलेल्या चलानांसाठी सवलतीनंतरची ८० टक्के रक्कम ३० दिवसांत भरावी लागेल. तर १ डिसेंबरपासून बजावण्यात येणाऱ्या चलानांवर ४५ दिवसांत भरणा केल्यास २० टक्के सूट मिळेल. न्यायालयात प्रलंबित असलेल्या पात्र चलानांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.


गृह विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बजावलेली आणि १ डिसेंबर रोजी वसुलीसाठी प्रलंबित असलेली पात्र ई-चलाने समाविष्ट असतील. या चलानांच्या थकित तडजोड रकमेवर २० टक्के सूट मिळेल. सवलतीनंतरची रक्कम योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत भरावी लागेल. दुसऱ्या टप्प्यात १ डिसेंबर २०२६ पासून बजावण्यात येणाऱ्या पात्र चलानांचा समावेश असेल. चलान विधिपूर्वक बजावल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत दंड भरल्यास २० टक्के सवलत मिळेल. हा लाभ ३० नोव्हेंबर २०२७ पर्यंत उपलब्ध असेल. तिसऱ्या टप्प्यात ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ या काळात बजावलेली आणि १ डिसेंबर रोजी सक्षम न्यायालयात किंवा आभासी न्यायालयात प्रलंबित असलेली पात्र चलाने येतील. या प्रकरणांतही थकित तडजोड रकमेवर २० टक्के सूट मिळेल. सवलतीनंतरची रक्कम ३० दिवसांत भरावी लागेल.






ही योजना वाहतूक पोलिसांनी किंवा त्यांच्या अधिकृत इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे बजावलेल्या चलानांनाच लागू असेल. परिवहन विभागाने जारी केलेली चलाने या योजनेत समाविष्ट नाहीत. मोटार वाहन अधिनियमाच्या कलम २०० नुसार तडजोड करता येणाऱ्या आणि २६ नोव्हेंबर २०२१ च्या अधिसूचनेतील संबंधित तरतुदींनुसार पात्र ठरणाऱ्या अपराधांनाच सवलत मिळेल. प्रत्येक पात्र अपराधासाठी देय थकित तडजोड रकमेच्या ८० टक्के रक्कम भरावी लागेल. एकाच चलानात अनेक अपराध नोंदवले असतील आणि त्यापैकी एक जरी अपराध तडजोड न करता येण्याजोगा असेल, तर संपूर्ण चलान सवलतीसाठी अपात्र ठरेल. सर्व अपराध तडजोडयोग्य असतील, तर संबंधित व्यक्तीच्या संमतीने त्यांची एकत्रित तडजोड करता येईल.


न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांत सक्षम पोलीस अधिकारी संबंधित व्यक्तीच्या संमतीने न्यायालयाच्या आदेशानुसार तडजोडीची प्रक्रिया पूर्ण करतील. चलान आणि न्यायालयीन प्रकरण क्रमांकाची पडताळणी करून भरणा स्वीकारला जाईल. त्याचा पुरावा आणि तडजोडीचा अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकरणाचा निपटारा नोंदविला जाईल. अन्य पात्र चलानांचा भरणा वाहतूक पोलिसांच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन किंवा जवळच्या वाहतूक पोलीस विभागात रोखीने करता येईल.



मुदत संपल्यानंतर कठोर कारवाई


- अभय योजना सुरू होण्यापूर्वी भरलेल्या चलानाच्या दंडाचा परतावा मिळणार नाही. रद्द झालेली किंवा निकाली निघालेली चलानेही सवलतीसाठी पात्र नसतील. न्यायालयाची स्थगिती असलेल्या प्रकरणांत संबंधित आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. नव्या चलानांसाठीची ४५ दिवसांची सवलत ही योजनेपुरती असून, केंद्रीय मोटार वाहन नियमांतील भरणा आणि हरकतीच्या वैधानिक मुदती कायम राहतील.


- योजनेचे टप्पे संपल्यानंतर प्रचलित कायदे आणि नियमांनुसार दंड आकारला जाईल. वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाना निलंबित करणे, वाहनाशी संबंधित व्यवहारांवर निर्बंध आणणे किंवा वाहन जप्त करणे यांसारखी कारवाई केली जाईल. योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा निधी’तून खर्च करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

जीवघेणा नायलॉन मांजा! यवतमाळमध्ये वृद्धाचा कान तुटून पडला; बंदी असूनही डोर कशी पोहोचली?

यवतमाळ : शहरात नायलॉन मांजामुळे पुन्हा एकदा एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

Devendra Fadnavis : जर्मन उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन केंद्रे उभारावीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : कुशल मनुष्यबळ, वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आणि विकसित औद्योगिक परिसंस्था यांमुळे महाराष्ट्रात जर्मन

Sunetra Pawar: पुणे गोळीबार प्रकरणाचा तपास 'फास्ट ट्रॅक'वर; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आदेश

मुंबई : शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री तथा

आधी बॉयफ्रेंडला पळवलं, नंतर तरूणीवर जंगलात अत्याचार; घटनेमुळे नागपूर शहर हादरलं...

नागपूर: नागपूर शहरातील सोनेगाव तलाव परिसरापासून जवळ असलेल्या एका निर्जन जंगल भागात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Nagpur Crime: एमडी ड्रग्सचा वाद अन् थेट जीवघेणा हल्ला! नागपुरात पाच जणांनी तरुणाला घेरलं; मित्रालाही मारहाण

उपराजधानी नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एमडी ड्रग्सच्या कथित तस्करीच्या

Gondia breaking news today : गोंदियात मोठी दुर्घटना! भरधाव पोलीस वाहनाने दुचाकीला चिरडले; ३ तरुणांचा जागीच अंत, संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला!

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगातील पोलीस गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची अत्यंत दुःखद घटना घडली