
मुंबई : कुशल मनुष्यबळ, वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आणि विकसित औद्योगिक परिसंस्था यांमुळे महाराष्ट्रात जर्मन उद्योगांसाठी गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. या संधींचा लाभ घेत जर्मनीतील उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्पांसोबतच संशोधन आणि विकास केंद्रे उभारावीत. या केंद्रांच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठांना सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.
जर्मनीतील लोअर सॅक्सोनी राज्याचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही राज्यांमधील औद्योगिक, आर्थिक आणि शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाली. या भागीदारीला ठोस स्वरूप देण्यासाठी वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेला ‘महाराष्ट्र-लोअर सॅक्सोनी संयुक्त कार्यगट’ स्थापन करण्याचा प्रस्ताव फडणवीस यांनी मांडला.
महाराष्ट्र आणि लोअर सॅक्सोनी या दोन्ही राज्यांची एकत्रित अर्थव्यवस्था सुमारे एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरची आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा सुमारे १५ टक्के वाटा असून, देशात येणाऱ्या थेट विदेशी गुंतवणुकीपैकी जवळपास एक तृतीयांश गुंतवणूक राज्यात येते. महाराष्ट्राने २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जर्मन उद्योगांसाठी राज्यात गुंतवणुकीच्या संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी गोळीबारात ठार केले. शुक्रवारी पहाटे ...
मुंबईतील वित्तीय आणि तंत्रज्ञान क्षेत्र, पुण्यातील वाहन व अभियांत्रिकी उद्योग, नागपूरची दळणवळण आणि औद्योगिक क्षमता, तसेच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील उत्पादन समूह राज्याच्या विकासाला गती देत आहेत. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि आगामी वाढवण बंदरामुळे जागतिक मूल्यसाखळी आणि निर्यात केंद्र म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होईल. पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, शिक्षण आणि मनुष्यबळ विकास या क्षेत्रांत राज्य शासन गुंतवणूक करीत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
वाहन उद्योग आणि भविष्यकालीन वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फोक्सवॅगन हा महाराष्ट्र आणि लोअर सॅक्सोनी यांच्यातील महत्त्वाचा औद्योगिक दुवा आहे. चाकण येथील उत्पादन सुविधांचे आधुनिकीकरण आणि इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनांसाठी नव्या गुंतवणूक कार्यक्रमाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. वाहन उत्पादन, अभियांत्रिकी, उत्पादन विकास, चाचणी आणि निर्यातीचे जागतिक केंद्र म्हणून महाराष्ट्राचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. अचूक अभियांत्रिकी, औद्योगिक स्वयंचलन, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, बॅटरी, एरोस्पेस आणि औद्योगिक कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतही सहकार्याच्या संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हरित ऊर्जा आणि औद्योगिक परिवर्तनाच्या क्षेत्रात लोअर सॅक्सोनीचे कौशल्य महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरू शकते. पवनऊर्जा, हरित हायड्रोजन, बॅटरी तंत्रज्ञान आणि कमी कार्बन उत्सर्जनाच्या पोलाद उत्पादनात दोन्ही राज्ये संयुक्त प्रकल्प राबवू शकतात. २०४७ पर्यंत राज्याच्या ऊर्जा मिश्रणात हरित ऊर्जेचा वाटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. हरित हायड्रोजन आणि त्यावर आधारित उत्पादनांचे जागतिक उत्पादन व निर्यात केंद्र बनण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. हरित पोलाद, औद्योगिक कार्बनमुक्ती, ऊर्जा साठवणूक, हरित अमोनिया आणि शाश्वत इंधन या क्षेत्रांत सहकार्याची संधी असल्याचे फडणवीस म्हणाले. जर्मन भाषा प्रशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पात्रता मान्यता आणि पारदर्शक भरतीसाठीही संयुक्त कार्यक्रम राबविण्याची भूमिका त्यांनी मांडली.
नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटीमध्ये लोअर सॅक्सोनीतील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. संयुक्त संशोधन कार्यक्रम, दुहेरी पदवी अभ्यासक्रम, उद्योगाभिमुख शिक्षण, विद्यार्थी देवाणघेवाण आणि महाराष्ट्रात शैक्षणिक संकुले स्थापन करण्यासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्राशी आर्थिक सहकार्य अधिक व्यापक आणि सखोल करणे हा दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे ओलाफ लाईस यांनी सांगितले. वाहन उद्योग, संरक्षण व सुरक्षा तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, बांधकाम आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांत दोन्ही राज्यांमध्ये सहकार्याची मोठी क्षमता आहे. सध्या सुरू असलेल्या गुंतवणुकीला बळ देण्यासोबतच उद्योग, संशोधक आणि नागरिकांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
फोक्सवॅगनने २००१ पासून महाराष्ट्रात सुमारे १.१ अब्ज युरोची गुंतवणूक केली आहे. राज्यातील कंपनीच्या दोन उत्पादन प्रकल्पांची एकत्रित वार्षिक क्षमता तीन लाख १५ हजार वाहनांची असून, तेथे चार हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. संशोधन आणि विकास क्षेत्रातील अभियंत्यांची संख्या ४५० वरून ७०० पेक्षा अधिक करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी यशस्वी झाल्यास बाजारपेठ प्रवेश, अतिरिक्त गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असे लाईस यांनी नमूद केले.
लोअर सॅक्सोनीमधील संरक्षण प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील संरक्षण उद्योगांच्या प्रतिनिधींना, तसेच हॅनोव्हर येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक व्यापार मेळ्यासाठी राज्याच्या व्यावसायिक शिष्टमंडळाला लाईस यांनी निमंत्रित केले. या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबळगण, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, जर्मनीचे भारतातील कॉन्सिलेट जनरल क्रिस्टोफ हॅलियर यांच्यासह दोन्ही राज्यांतील अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.






