Dhadkan Sequel: 26 वर्षांनंतर 'धडकन 2' येणार? अक्षय-शिल्पाच्या जागी दिसणार नवी जोडी!
2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धडकन' (Dhadkan) या सुपरहिट चित्रपटाचं नावही चर्चेत आलं आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांच्या सुपरहिट ‘धडकन’ चित्रपटाच्याही सीक्वेलची चर्चा सध्या सुरु आहे.
November 27, 2026 03:26 PM
Dhadkan Sequel
Dhadkan 2 : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल आणि रिमेक बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. 90 च्या दशकातले काही हिट चित्रपटांचे सीक्वेल रिलीजही झाले. त्यातले काही चालले तर काही फ्लॉप झाले. याच यादीत आता 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धडकन' (Dhadkan) या सुपरहिट चित्रपटाचं नावही चर्चेत आलं आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांच्या सुपरहिट ‘धडकन’ चित्रपटाच्याही सीक्वेलची चर्चा सध्या सुरु आहे. तब्बल 26 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे बोलले जात आहे. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक चित्रपटातील गाणी आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सोशल मीडियावर तर यावर आजही मीम्सही बनवले जातात. मात्र सीक्वेलमध्ये अक्षय आणि शिल्पाच्या जागी फ्रेश जोडी दिसण्याची शक्यता आहे. मात्र, सुनील शेट्टी या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
'धडकन 2' ची तयारी सुरू?
चित्रपटाचे निर्माते 'धडकन 2' या चित्रपटासाठी प्राथमिक स्तरावर चर्चा करत आहेत. मात्र, हा चित्रपट पहिल्या भागाची पुढची स्टोरी नसून पहिल्या चित्रपटाप्रमाणेच प्रेम, नातेसंबंध, भावनिक गुंतागुंत आणि विरह या विषयांभोवती नव्या चित्रपटाची कथा गुंफली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या 'धडकन'ची आठवण करून देणारी, पण वेगळी स्टोरी या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते.
2000 साली प्रदर्शित झालेल्या 'धडकन' या चित्रपटात अक्षय कुमारने राम, शिल्पा शेट्टीने अंजली, तर सुनील शेट्टीने देवची भूमिका साकारली होती. या तिघांच्या अभिनयाला आणि चित्रपटातील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली होती. मात्र, 'धडकन 2' साठी निर्माते नव्या कलाकारांचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता सध्या कमी आहे.
Solapur DCC Bank Election Result 2026: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते ती सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ...
तर अभिनेता सुनील शेट्टीने साकारलेल्या देव ह्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. आता नव्या चित्रपटात त्याला कॅमिओ भूमिकेसाठी विचारण्यात आल्याचं समजतं. मात्र, त्याची भूमिका नेमकी काय असेल आणि कथेत त्याचं महत्त्व किती असेल, याबाबत अद्याप माहिती नाही.
पहिल्या भागाचं दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं होतं. मात्र, दुसऱ्या भागासाठी नव्या दिग्दर्शकाच्या नावाची चर्चा सुरू आहे. 'टॉयलेट : एक प्रेम कथा' आणि 'बत्ती गुल मीटर चालू' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे श्री नारायण सिंह यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात येणार आहे. निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यात यासंदर्भात प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
'धडकन 2' या चित्रपटासंदर्भात चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. तर चित्रपटाची पटकथा आणि प्री-प्रॉडक्शनचं काम सुरुवातीच्या स्तरावर असल्याचं सांगितलं जातंय. मुख्य भूमिकांसाठी नव्या कलाकारांचा शोध सुरू असून, कास्टिंगबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान, या चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.