Friday, November 27, 2026

Ducati DesertX V2 भारतात लॉन्च ; दमदार 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स

लांब पल्ल्याच्या आणि ऑफ-रोड प्रवासासाठी Ducati कडून या बाईकसोबत विविध अ‍ॅक्सेसरीजचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Ducati DesertX V2 : भारतीय प्रीमियम बाईक बाजारात Ducati ने आपली नवी अ‍ॅडव्हेंचर बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने दुसऱ्या जनरेशनची Ducati DesertX V2 भारतीय बाजारात आणली असून, या बाईकची एक्स-शोरूम किंमत 19.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या सर्व डीलरशिपवर या बाईकच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ग्राहकांना तिची डिलिव्हरी मिळणार आहे. दमदार इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑफ-रोड रायडिंगसाठी खास फीचर्स ही या बाईकची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

890cc इंजिनमधून मिळणार 110hp पॉवर

नव्या Ducati DesertX V2 मध्ये 890cc क्षमतेचे V2 ट्विन-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 110hp पॉवर, तर 7,000 rpm वर 92Nm टॉर्क निर्माण करते. विशेष म्हणजे, 3,000 rpm पासूनच या बाईकमध्ये कमाल टॉर्कच्या जवळपास 70 टक्के टॉर्क उपलब्ध होतो, असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये IVT म्हणजेच व्हेरिएबल इनटेक व्हॉल्व्ह टाइमिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

बाईकच्या गिअरबॉक्समध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीचे चार गिअर्स छोटे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अवघड ऑफ-रोड रस्त्यांवर रायडिंग करणे सोपे होणार आहे. तर सहावा गिअर लांब ठेवण्यात आला असून, त्यामुळे हायवेवर आरामदायी प्रवास करता येणार आहे.

मजबूत फ्रेम आणि अ‍ॅडजस्टेबल सस्पेन्शन

या बाईकमध्ये अ‍ॅल्युमिनियम मोनोकॉक फ्रेम देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही फ्रेम एअरबॉक्सचे कामही करते. मागील बाजूला ट्रेलिस सबफ्रेम आणि डबल-साइडेड अ‍ॅल्युमिनियम स्विंगआर्म देण्यात आला आहे. सस्पेन्शनसाठी KYB कंपनीचे सेटअप मिळते. पुढील बाजूला 46mm अपसाइड-डाउन फोर्क असून, त्याचा ट्रॅव्हल 230mm आहे. मागील बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले असून, त्याचा ट्रॅव्हल 220mm आहे. यामध्ये रिमोट प्रीलोड अ‍ॅडजस्टमेंटची सुविधाही मिळते. बाईकमध्ये पुढे 21 इंच आणि मागे 18 इंचाचे ट्यूबलेस स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत. त्यावर Pirelli Scorpion Rally STR टायर्स बसवण्यात आले आहेत.

सहा रायडिंग मोडसह अ‍ॅडव्हान्स फीचर्स

रायडर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी या बाईकमध्ये 6-अ‍ॅक्सिस IMU देण्यात आले आहे. याच्या मदतीने कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल आणि इंजिन ब्रेक कंट्रोल यांसारखी फीचर्स काम करतात. विशेष म्हणजे Enduro आणि Rally मोडमध्ये ABS पूर्णपणे बंद करण्याचाही पर्याय मिळतो.

यामध्ये Sport, Touring, Urban, Wet, Enduro आणि Rally असे एकूण सहा रायडिंग मोड देण्यात आले आहेत. याशिवाय 5 इंच TFT डिस्प्ले, नवीन जॉयस्टिक कंट्रोल, फुल LED हेडलाइट्स, क्रूझ कंट्रोल आणि Brake Light EVO यांसारखी फीचर्स मिळतात. Ducati Quick Shift 2.0 सिस्टीमचाही समावेश आहे.

अ‍ॅडव्हेंचर रायडिंगसाठी खास अ‍ॅक्सेसरीज

लांब पल्ल्याच्या आणि ऑफ-रोड प्रवासासाठी Ducati कडून या बाईकसोबत विविध अ‍ॅक्सेसरीजचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये 8 लिटरची अतिरिक्त इंधन टाकी, बुल बार, रेडिएटर गार्ड, अ‍ॅल्युमिनियम पॅनियर्स आणि Mosko Moto सोबत तयार केलेली सॉफ्ट लगेज किट यांचा समावेश आहे. याशिवाय Termignoni सायलेंसरचाही पर्याय उपलब्ध आहे.

रेसिंगच्या अनुभवातून तयार झाली नवी DesertX

Ducati DesertX ही बाईक पहिल्यांदा 2019 मध्ये EICMA शोमध्ये कॉन्सेप्ट स्वरूपात सादर करण्यात आली होती. त्यानंतर 2021 मध्ये तिचे प्रोडक्शन मॉडेल आणण्यात आले. नव्या जनरेशनची DesertX तयार करताना कंपनीने Erzbergrodeo, Rally of Albania, Transanatolia आणि NORRA Mexican 1000 यांसारख्या अ‍ॅडव्हेंचर रेसमधील अनुभवाचा उपयोग केला आहे.

भारतीय बाजारात ही बाईक Matt Star White Silk या रंगात उपलब्ध होणार आहे. 19.99 लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च झालेली ही नवी Ducati DesertX V2 प्रीमियम अ‍ॅडव्हेंचर बाईक सेगमेंटमध्ये ग्राहकांचे लक्ष वेधून घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >