
काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र मागे पडत चालले आहेत का? या प्रश्नाभोवती फिरणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ हा हिंदी चित्रपट ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच जगासमोर आला. नालंदा जिल्ह्यातील एका लहानशा गावात वाढलेले दिग्दर्शक सर्फराज आलम यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. दोन वर्षांपूर्वी ते आपल्या जुन्या शाळेत गेले होते, तेव्हा त्यांना एक वेगळंच चित्र दिसलं. वर्गात फळा नव्हता, त्याच्या जागी स्मार्ट बोर्ड लागला होता. आणि वर्षानुवर्षे फळ्यावर शिकवणारे त्यांचे शिक्षक या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना धडपडत होते. तोच क्षण या चित्रपटाच्या जन्माचं कारण ठरला.
इफ्फीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आलम यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, माझ्या शिक्षकांना नव्या तंत्रज्ञानाशी झगडताना पाहिलं आणि मला वाटलं, ही फक्त माझ्या शाळेची नाही, तर देशभरातील अनेक शाळांची गोष्ट आहे. एकेकाळी डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी घडवणारे हे शिक्षक आज तंत्रज्ञान आणि बदलत्या मानसिकतेमुळे अडचणीत सापडले आहेत. बिहारच्या एका साध्या शाळेतून रशियात वैद्यकीय शिक्षण आणि नंतर न्यूयॉर्क फिल्म अकादमीपर्यंतचा प्रवास केलेल्या आलम यांनी शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांचा आदर, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील बदलतं नातं, आणि शिक्षणात हरवत चाललेला भावनिक जिव्हाळा, असे अनेक मुद्दे या चित्रपटातून मांडण्यात आले आहेत. पूर्वी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक वेगळं नातं होतं, ते आता हळूहळू कमी होत चाललं आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मुंबई : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी परतला आहे. IPL 2027 च्या आगामी ...
कार्टिना एंटरटेनमेंट अँड स्पोर्ट्स निर्मित या सुमारे १०४ मिनिटांच्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विनय पाठक यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयाचं आलम यांनी विशेष कौतुक केलं. तरुणांनी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यापेक्षा नीट निरीक्षण करावं आणि ऐकून घ्यावं, असा सल्लाही त्यांनी दिला. बिहारमधील पायाभूत सुविधांच्या विकासाबद्दल बोलताना आलम म्हणाले, बिहारची प्रगती आणि यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकतं. फळ्यापासून स्मार्ट बोर्डपर्यंतचा प्रवास दाखवणारा हा चित्रपट केवळ तंत्रज्ञानाची गोष्ट सांगत नाही, तर बदलत्या समाजात शिक्षकांचं स्थान काय आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित करतो. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान सुरू असलेल्या इफ्फीच्या ‘सीमाविरहित कथा’ या संकल्पनेशी हा चित्रपट अगदी जुळणारा आहे.






