Friday, November 27, 2026

दक्षिणेत पावसाचा तडाखा, उत्तरेत दाट धुक्याचा कहर! हवामान विभागाचा खळबळजनक इशारा; 50 किमी ताशी वेगाने वारे वाहणार

भारतीय हवामान विभागाने 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीसाठी हवामानाचा मोठा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण भारत आणि अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर उत्तर आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांत दाट धुके आणि पूर्व राजस्थानमध्ये शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत असून, भारतीय हवामान विभागाने 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीसाठी सविस्तर हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसासह वादळी वाऱ्यांचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, उत्तर आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर पसरण्याचा अंदाज असून, पूर्व राजस्थानच्या काही भागांत शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये 27 ते 28 नोव्हेंबर दरम्यान अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात. किनारपट्टी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागांत 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ आणि माहे येथे 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यानही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. कर्नाटकच्या किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत भागांत 27 ते 28 नोव्हेंबर दरम्यान, तर तेलंगणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात 27 नोव्हेंबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसासोबतच दक्षिण भारतातील काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, यानम, केरळ, माहे, लक्षद्वीप, रायलसीमा आणि तमिळनाडू-पुद्दुचेरीमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतात, तर काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी 50 किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. केरळ, माहे आणि तमिळनाडू-पुद्दुचेरीमध्ये 27 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस होऊ शकतो. लक्षद्वीपमध्ये 26 आणि 27 नोव्हेंबर दरम्यान अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर 27 ते 28 नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडेल आणि त्यानंतर 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान पावसाचा विस्तार वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी काही भागांत मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतात.

दरम्यान, पूर्व राजस्थानमध्ये 27 आणि 28 नोव्हेंबर दरम्यान शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व व पश्चिम भागांत 27 ते 28 नोव्हेंबर दरम्यान दाट धुके पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयमध्ये 27 नोव्हेंबर रोजी, तर हिमाचल प्रदेशमध्ये 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान धुक्याचा प्रभाव राहू शकतो. ओडिशामध्येही 27 नोव्हेंबर रोजी दाट धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी होऊन प्रवासात अडथळे येण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >