Friday, November 27, 2026

Devendra Fadnavis: वसई-विरार, कर्जतला गेलेल्या गिरणी कामगारांना पुन्हा मुंबईत आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

बीडीडी चाळ पुनर्विकास देशातील सर्वांत मोठा नागरी प्रकल्प

मुंबई : पूर्वीच्या धोरणांमुळे दक्षिण मुंबईतून वसई, विरार आणि कर्जतपर्यंत स्थलांतरित व्हावे लागलेल्या गिरणी कामगारांना पुन्हा मुंबईतच घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे आणि त्याला हक्काचे मोठे घर मिळाले पाहिजे, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. बीडीडी चाळ पुनर्विकास हा देशातील सर्वांत मोठा नागरी प्रकल्प असल्याचे सांगत, आगामी काळात मुंबईकरांना मालकी हक्काची घरे देण्याची मोहीम अधिक व्यापक केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.(MillWorkers)

नागरी निवारा परिषदेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्याच्या आदेशांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने नागरी निवारा परिषदेचा कायदा करण्यात आला होता. मध्यंतरीच्या काळात या कायद्याचा काही प्रमाणात गैरवापर झाला असला, तरी त्याअंतर्गत अनेक आदर्श कामे झाली. आतापर्यंत 625 कुटुंबांना हक्काची घरे मिळाली असून, हे मोठे स्वप्न साकार झाल्याचे फडणवीस म्हणाले.

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे मुंबईत सुमारे 1 हजार 600 प्रकल्प मार्गी लागले आहेत. पूर्वी सामान्य मुंबईकरांना 300 ते 350 चौरस फुटांच्या घरात दाटीवाटीने राहावे लागत होते. मात्र, आता पुनर्विकासातून त्यांना 1 हजार 200 चौरस फुटांपर्यंतची घरे मिळत आहेत. मी स्वतः घरांच्या चाव्या देताना या घरांची पाहणी केली असून, त्यातून झालेल्या परिवर्तनाची प्रचिती आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.(GirniKamgar)

मुंबईची ओळख असलेल्या जुन्या वसाहती आणि चाळींच्या पुनर्विकासावरही सरकारने भर दिला आहे. जुन्या वसाहतींमधील रहिवाशांना त्याच ठिकाणी आधुनिक सुविधांसह चांगले जीवनमान मिळावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अवघ्या 120 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना त्याच ठिकाणी  ते 600 चौरस फुटांचे आधुनिक घर कोणताही खर्च न घेता दिले जात आहे. या माध्यमातून रहिवाशांच्या जीवनमानात मोठा बदल घडवण्याचे काम सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

मुंबईकरांना मालकी हक्काची घरे देण्याची प्रक्रिया यापुढे अधिक वेगाने राबवली जाईल. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या वर्ग-1 रूपांतरणासाठी आणि मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मंत्री आशिष शेलार यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. 'हे सर्व जनतेचे आहे आणि जनतेलाच सन्मानाने परत करायचे आहे', असे सांगत आगामी काळात ही मोहीम अधिक व्यापक करून जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोहोचवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.(MaharashtraPolitics)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >