
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यात अवैध स्फोटक पदार्थांच्या साठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कसबे वणी येथील जगदंबानगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये जिलेटीनच्या २०० कांड्यांसह अन्य स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे. वणी पोलिसांनी छापा टाकत सुमारे ७ हजार रुपये किमतीचा स्फोटक साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, कसबे वणी येथील जगदंबानगर परिसरात दीपक संजय सुरासे याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.
नाशिक : तुमच्या वाहनाला अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एचएसआरपी नंबर प्लेट न बसवणाऱ्या ...
जिलेटीनच्या 200 कांड्या जप्त
या कारवाईत पोलिसांना ३ हजार रुपये किमतीच्या २०० जिलेटीनच्या कांड्या, ३ हजार ५०० रुपये किमतीची लाल रंगाची 'DEF Corex' वायर आणि ५०० रुपये किमतीची डिटोनेटर बॅटरी आढळून आली. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले असून, जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांची एकूण किंमत ७ हजार रुपये असल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात दीपक सुरासे आणि ओझरमिग येथील संदीप अक्कर यांनी संगनमताने कोणताही अधिकृत शासकीय परवाना किंवा स्फोटक पदार्थ हाताळण्याचे प्रमाणपत्र नसताना हा साठा बाळगल्याचे समोर आले आहे. तसेच संदीप अक्कर याने दीपक सुरासे याला हे स्फोटक पदार्थ पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस हवालदार मुज्जम्मील देशमुख यांच्या फिर्यादीवरून दीपक संजय सुरासे (वय ३२, रा. जगदंबानगर, कसबे वणी) आणि संदीप अक्कर (रा. ओझरमिग, ता. निफाड) या दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात (Wani Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दीपक सुरासे याला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीबाबत पुढील तपास सुरू आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये स्फोटकांचा साठा नेमका कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आला होता आणि त्याचा वापर कुठे केला जाणार होता, याचा तपास आता वणी पोलीस करत आहेत.






