
नाशिक : तुमच्या वाहनाला अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एचएसआरपी नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांविरोधात परिवहन विभागाने आता कडक कारवाई सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १२ हजार ६८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, १० लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील अनेक वाहनधारकांनी अद्याप या नियमाकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, नाशिकमध्ये १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेली एकूण ११ लाख २० हजार ९९९ वाहने आहेत. त्यापैकी केवळ ४ लाख १८ हजार ३१८ वाहनांवरच एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. म्हणजेच ६० टक्क्यांहून अधिक वाहनांवर अद्याप ही नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही.
नाशिक : दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या ...
12 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई
त्यामुळे परिवहन विभागाने १ जुलै २०२६ पासून विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. आरटीओची वायुवेग पथके महामार्ग, प्रमुख रस्ते, तपासणी नाके आणि गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करत आहेत. दुचाकींपासून चारचाकी वाहनांपर्यंत सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत १२ हजार ६८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, सुमारे १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ही विशेष तपासणी आणि कारवाई मोहीम सुरू राहणार आहे.
दरम्यान, वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाने दोन संकेतस्थळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहनधारकांनी maharashtrahsrp.com किंवा transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करून नंबर प्लेट बसवून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे तुमच्या वाहनावर अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट नसेल, तर विलंब न करता ती बसवून घ्या. अन्यथा आरटीओच्या तपासणीत पकडले गेल्यास दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.






