Friday, November 27, 2026

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने दर्शनासाठी बंद राहणार ? दर्शनपथाच्या कामावरून मोठा पेच

मंदिर बंद ठेवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित प्राधिकरण किंवा प्रशासनाकडे असल्याचे देवस्थानच्या विश्वस्तांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शनपथाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर सलग अडीच महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) ही मागणी केली असली, तरी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यास त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने असमर्थता दर्शवली आहे. मंदिर बंद ठेवण्याचा अधिकार देवस्थानला नसल्याचे स्पष्ट करत विश्वस्त मंडळाने हा निर्णय नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडे सोपवला आहे.

दर्शनपथाच्या कामावरून मोठा पेच

कुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात येत असताना त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. हे काम जलदगतीने पूर्ण व्हावे, यासाठी मंदिरातील नियमित, सशुल्क आणि विशेष दर्शन सलग अडीच महिन्यांसाठी बंद ठेवण्याची एमएसआयडीसीची मागणी आहे. या कालावधीत मंदिरातील परंपरेनुसार नित्यपूजा सुरू ठेवण्यात यावी आणि त्यासाठी केवळ देवस्थानने नियुक्त केलेल्या पुरोहितांनाच सुरक्षित मार्गाने मंदिरात प्रवेश द्यावा, अशी भूमिका महामंडळाने मांडली आहे.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीत राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी दिलेल्या मार्गदर्शनाची माहिती देवस्थानचे अध्यक्ष तथा नाशिकचे सहधर्मादाय आयुक्त विवेक सोनुने यांनी विश्वस्तांसमोर मांडली. यावेळी विश्वस्तांनी मंदिराचा इतिहास आणि धार्मिक परंपरेचा संदर्भ देत आजवर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी कधीही बंद ठेवण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.

तसेच, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात मंदिर बंद ठेवण्याचा किंवा भाविकांना दर्शनापासून रोखण्याचा अधिकार देवस्थानला दिलेला नसल्याचे विश्वस्तांनी निदर्शनास आणून दिले. या अधिनियमातील मंदिराच्या व्याख्येनुसार हिंदू समाजाला मंदिरात धार्मिक उपासना आणि दर्शन घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मंदिर बंद ठेवल्यास भाविकांच्या धार्मिक अधिकारांवर मर्यादा येऊ शकतात. असा निर्णय घेतल्यास त्याला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.

निर्णय कुंभमेळा प्राधिकरणाकडे

दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाला कुंभमेळ्याच्या आयोजन आणि व्यवस्थापनासाठी नियोजन, समन्वय व अंमलबजावणीचे अधिकार देण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि भाविकांची सुरक्षितता यांसारख्या बाबींवर प्राधिकरण निर्देश देऊ शकते. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित प्राधिकरण किंवा प्रशासनाकडे असल्याचे देवस्थानच्या विश्वस्तांनी स्पष्ट केले आहे.

कुंभमेळ्याच्या काळात त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दर्शन व्यवस्थेवरील ताण, वाहतूक कोंडी, गर्दी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था आणि भाविकांची सुरक्षितता या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी संबंधित अधिनियमांतर्गत दिलेले आदेश आणि सूचना संबंधित संस्था व व्यक्तींना बंधनकारक असतात. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्याबाबत प्राधिकरणाने लेखी निर्देश दिल्यास त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देवस्थानवर राहणार आहे.

त्यामुळे आता त्र्यंबकेश्वर मंदिरातील नियमित, सशुल्क आणि विशेष दर्शन अडीच महिन्यांसाठी बंद राहणार की दर्शनपथाचे काम सुरू ठेवून भाविकांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय कुंभमेळा प्राधिकरण काय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >