Friday, November 27, 2026

बँकेमध्ये नोकरीची संधी, अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेमध्ये वाढ; 837 पदांसाठी केली जातेय नोकरभरती

बँक ऑफ बडोदाच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागामध्ये तब्बल 837 पदांसाठी भरती निघाली असून अर्ज करण्याची मुदत आता 7 डिसेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये सीनियर रिलेशनशिप मॅनेजरच्या सर्वाधिक 791 जागा असून, ही भरती फिक्स्ड टर्म करार पद्धतीवर घेण्यात येणार आहे.

मुंबई: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. वेल्थ मॅनेजमेंट पदासाठी 'बँक ऑफ बडोदा' बँकेमध्ये काम करण्याची संधी आता आली आहे. 'बँक ऑफ बडोदा' बँकेमध्ये विविध पदांसाठी तब्बल 837 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची आधीची मुदत 24 नोव्हेंबर 2026 पर्यंतची होती. मात्र, ज्या उमेदवारांनी अजूनही ऑनलाईन अर्ज केला नसेल, त्यांच्यासाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. बँकेने अर्जाची अंतिम मुदत वाढवली असून, आता इच्छुक उमेदवार 7 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीच्या माध्यमातून, ग्रुप हेड, हेड इन्व्हेस्टमेंट, टेरिटरी हेड, इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट मॅनेजर आणि सीनियर रिलेशनशिप मॅनेजर ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 837 पदांपैकी तब्बल 791 पदे एकट्या सीनियर रिलेशनशिप मॅनेजरसाठी राखीव आहेत. ही नेमणूक कायमस्वरूपी नसून फिक्स्ड टर्मवर नसून कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्येक पदानुसार आवश्यक अनुभव आणि प्रमाणपत्रे वेगवेगळी आहेत. ग्रुप हेड पदासाठी किमान 12 वर्षांचा अनुभव आणि 5 वर्षे टीम लीड केल्याचा अनुभव आवश्यक असून, MBA, CFP किंवा CFA यांसारख्या पात्रतेला प्राधान्य मिळेल.

हेड इन्व्हेस्टमेंटसाठी 10 वर्षांचा अनुभव आणि नेतृत्व कौशल्याची गरज आहे. टेरिटरी हेडसाठी 8 वर्षे, इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट मॅनेजमेंटसाठी 5 वर्षे आणि सीनियर रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी किमान 3 वर्षांचा संबंधित अनुभवाची गरज आहे. अनेक पदांसाठी NISM आणि IRDA प्रमाणपत्रे अनिवार्य आहेत. वयोमर्यादा 1 नोव्हेंबर 2026 तारखेप्रमाणे मोजण्यात येणार आहे. पदांनुसार वयोमर्यादा 24 ते 50 वर्षांपर्यंत वेगवेगळी आहे. सीनियर रिलेशनशिप मॅनेजरसाठी 24 ते 35 वर्षे, तर ग्रुप हेड आणि हेड इन्व्हेस्टमेंटसाठी 35 ते 50 वर्षे वयोमर्यादा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार नोकरभरतीमध्ये वयामध्ये सवलत मिळणार आहे. वेतनाबाबत बोलायचे झाल्यास, बँकेने कोणतीही ठराविक रक्कम जाहीर केलेली नाही. उमेदवाराचे शिक्षण, अनुभव, शोवटचा पगार आणि बाजारातील मानकांनुसार वेतन निश्चित केले जाईल.

उमेदवारांची निवड अर्जांची छाननी, शॉर्टलिस्टिंग, ऑनलाइन किंवा सायकोमेट्रिक चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांचा करार सुरुवातीला 5 वर्षांचा असेल आणि उत्तम कामगिरीच्या जोरावर तो जास्तीत जास्त 5 वर्षांनी वाढवता येऊ शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >