
Nashik : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्याने विभागस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नाशिक तालुक्यातील दुगांव (पेसा) ग्रामपंचायतीने उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीला तब्बल १ कोटी रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे दुगांव ग्रामपंचायतीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग आणि जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत विभागीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर येथील नगर कल्याण रोडवरील द्वारका लॉन येथे हा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमात 'सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात, समृद्ध गावाचा संकल्प' या विषयावर विभागीय कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Bank Holiday December 2026 : जर तुम्ही डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण डिसेंबर ...
या पुरस्कार स्पर्धेत दुगांव ग्रामपंचायतीने आपल्या कामगिरीच्या जोरावर इतर ग्रामपंचायतींना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला. ग्रामपंचायतीने गावात लोकसहभागातून राबवलेली विविध विकासकामे, प्रशासकीय कामकाजातील कार्यक्षमता, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न यामुळे या ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाला आहे.
दरम्यान, या यशाबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दुगांव ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर गवे, उपसरपंच हरिभाऊ धोंडगे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बोराडे यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. तसेच यापुढेही लोकसहभागातून गावांच्या सर्वांगीण विकासाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले. दुगांव ग्रामपंचायतीच्या या यशामुळे नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.





