
Nashik Police Transfer : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले. या बदल्यांमुळे शहरातील विविध पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिस ठाण्यातील जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार आहे.
आदेशानुसार, पोलिस निरीक्षक अविनाश नडविनकेरी यांची अंबड पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखा युनिट २ येथे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिला पोलिस निरीक्षक काजल मोरे यांची इंदिरानगर पोलिस ठाण्यातून अंबड पोलिस ठाण्यात दुय्यम जबाबदारीवर बदली करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पंकज अशोक बैसाणे यांची देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत, तर सहायक पोलिस निरीक्षक धीरज गवारे यांची म्हसरूळ पोलिस ठाण्यातून सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांची मुंबईनाका शहर वाहतूक शाखा युनिटमधून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पोलिस उपनिरीक्षक अफरोज जब्बार शेख यांची मुंबईनाका पोलिस ठाण्यातून सायबर पोलिस ठाण्यात, तर पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन यांची पीसीबी-एमओबी शाखेतून एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
मालेगाव : शेतातील झाडावरून अवघी तीन-चार बोरं तोडून खाल्ल्याच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलींना शिवीगाळ करत मारहाण केल्याची संतापजनक घटना मालेगाव ...
तात्काळ नवीन ठिकाणी हजर होण्याचे आदेश
या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हजर होऊन पदभार स्वीकारावा आणि त्याबाबतचा अनुपालन अहवाल पोलिस आयुक्तालयाला सादर करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित ठिकाणी तात्पुरता कार्यभार सोपवण्याचा निर्णय तेथील प्रभारी अधिकारी घेणार आहेत.
दरम्यान, नाशिक शहर पोलिस दलातील या अंतर्गत बदल्यांमुळे विविध विभागांच्या कामकाजात फेरबदल होणार असून, आगामी काळातील प्रशासकीय नियोजनाच्या दृष्टीने या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.






