Saturday, November 28, 2026

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले ! एकीकडे नागरिकांचा मृत्यू, तर दुसरीकडे तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ले

युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेनुसार, उत्तर चेर्निहिव्ह भागातील निझिन येथे एका आस्थापनेवर रशियाने केलेल्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला असून अन्य सात जण जखमी झाले आहेत. राजधानी कीव्हमध्येही ड्रोन हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर किमान चार जण जखमी झाले आहेत.

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झाले असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू आहे. शनिवारी युक्रेनच्या विविध भागांत रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये किमान 10 नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, रशियाने एका रात्रीत तब्बल 1,246 युक्रेनी ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील हवाई संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

युक्रेनमध्ये ड्रोन हल्ल्यांत 10 जणांचा मृत्यू

युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेनुसार, उत्तर चेर्निहिव्ह भागातील निझिन येथे एका आस्थापनेवर रशियाने केलेल्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला असून अन्य सात जण जखमी झाले आहेत. राजधानी कीव्हमध्येही ड्रोन हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर किमान चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, रशियाच्या ताब्यात असलेल्या दक्षिण झापोरिझ्झिया भागात रुग्णालयाच्या वाहनाला युक्रेनी ड्रोनची धडक बसली. या घटनेत एका परिचारिकेसह वाहनचालकाचा मृत्यू झाला. तर आघाडीवरील रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर आणि अन्य एक जण जखमी झाले.

वीज आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य

रशियाने युक्रेनमधील ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले आहे. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री डागण्यात आलेल्या 162 रशियन ड्रोनपैकी 141 ड्रोन नष्ट करण्यात आले. मात्र, कीव्हजवळील बिला त्सेरक्वा शहरात झालेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बिला त्सेरक्वा येथील हीट अँड पॉवर प्लांट तसेच कीव्हमधील इलेक्ट्रिकल सबस्टेशनला लक्ष्य केल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यांमुळे शहरातील काही भागांमध्ये वीज आणि पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याचा इशारा कीव्हचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिला आहे.

रशियाचा मोठा दावा

दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एका रात्रीत 1,246 युक्रेनी ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांच्या माहितीनुसार, आठ तासांच्या कालावधीत मॉस्कोच्या दिशेने येणारे 123 ड्रोन नष्ट करण्यात आले. शुक्रवार संध्याकाळपासून मॉस्को क्षेत्राच्या दिशेने एकूण 462 ड्रोन आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

रशियातील तेल रिफायनरीला लक्ष्य केल्याचा दावा

युक्रेनने रशियातील ऊर्जा आणि औद्योगिक केंद्रांनाही लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. दक्षिण रोस्तोव्ह क्षेत्रातील नोवोशाख्तिन्स्क शहरात 50 हून अधिक ड्रोन पाडल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. मात्र, सोशल मीडियावरील वृत्तांनुसार काही ड्रोन नोवोशाख्तिन्स्क येथील प्रमुख तेल रिफायनरीवर आदळले. या हल्ल्यानंतर रिफायनरी परिसरात मोठी आग लागल्याचा दावा करण्यात आला आहे.

तेल पाइपलाइन जंक्शनवरही हल्ला

रशियाच्या समारा भागात औद्योगिक आस्थापनांवर झालेला ड्रोन हल्ला हाणून पाडल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. मात्र, काही टेलिग्राम वृत्तवाहिन्यांच्या दाव्यानुसार, सरकारी तेल कंपनी ट्रान्सनेफ्टच्या चार तेल पाइपलाइन जोडणाऱ्या केंद्राला ड्रोनद्वारे लक्ष्य करण्यात आले. याच महिन्यात या ठिकाणी झालेला हा दुसरा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.याशिवाय, युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या ब्रायन्स्क भागात एका कंपनीच्या बसवर ड्रोन पडल्याने नऊ जण जखमी झाले आहेत.

युक्रेनकडून रशियातही प्रतिहल्ले

रशियाच्या अंतर्गत भागांतील लष्करी आणि औद्योगिक ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी युक्रेन स्वदेशी विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर करत आहे. गेल्या आठवड्यात युक्रेनने लिबियातील बंदरावर उभ्या असलेल्या रशियन नौदलाच्या जहाजावर समुद्री ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केल्याचेही वृत्त आहे. एकीकडे युक्रेनमधील ऊर्जा प्रकल्प आणि नागरी वस्त्यांवर हल्ले होत असताना दुसरीकडे रशियातील तेल प्रकल्प आणि औद्योगिक केंद्रांनाही लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धातील ड्रोन हल्ल्यांचे प्रमाण आणि व्याप्ती वाढत असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >