Home महाराष्ट्र कोकण जपानच्या कोयासान टेकडीवर डॉ. आंबेडकरांचा पुतळा

जपानच्या कोयासान टेकडीवर डॉ. आंबेडकरांचा पुतळा

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्न नसून ते विश्वरत्न आहेत. हे जपान देशाने दाखवून दिले आहे. अत्यंत पवित्र मानल्या जाणा-या जपानच्या कोयासान टेकडीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

कुडाळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्न नसून ते विश्वरत्न आहेत. हे जपान देशाने दाखवून दिले आहे. अत्यंत पवित्र मानल्या जाणा-या जपानच्या कोयासान टेकडीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. भारतातील राष्ट्रपुरुषाचा परदेशात उभारला जाणारा हा पहिलाच पुतळा आहे. या पुतळयाची निर्मिती सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कुडाळ एमआयडीसी येथे जेष्ठ शिल्पकार बाळकृष्ण उर्फ दाजी पांचाळ करत आहेत. येत्या मार्चपर्यंत हा पुतळा पूर्ण होणार आहे.

विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकरुणी गौतम बुद्ध त्यांच्या विचाराने प्रेरीत झालेला जपान देश. बौद्ध धम्माचे माहेरघर भारत देश आहे. धम्माची जनजागृती आणि त्याचा प्रसार करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि पुन्हा एकदा धम्माची शिकवण तमाम समाजाला देण्यास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बौद्ध आणि त्याचा धम्म’ हे पुस्तकही  लिहिले. धम्मासाठी त्यांनी दिलेले योगदान तसेच समाज परिवर्तनासाठी त्यांचे जगभरासाठी दिलेले विचार ते सर्वानाच प्रेरणा देणारे आणि जीवन घडविणारे विचार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने सहकार्याचा एक भाग म्हणून जपानमधील वाकायामा राज्याबरोबर महाराष्ट्र राज्याचा सामंजस्य करार झाला होता.

जपान मधील कोयासान टेकडीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचे निश्चित झाल्यावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या निविदांमधून कुडाळ एमआयडीसी येथे स्टुडिओ असलेल्या दाजी पांचाळ यांना हा पुतळा बनविण्याचे काम मिळाले. हा पुतळा साडेसहा फूट उंचीचा पंचधातूंचा आहे. चार फुटाचा चौथरा व साडेसहा फूट उंचीचा मिळून सोडदहा फूट उंचींची कलाकृती असणार आहे. याला २२.२५ लाख रुपये अपेक्षित खर्च आहे. माती कामानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून जेजे स्कूल ऑफ आर्टस्च्या वास्तूशिल्प विभागाची मंजुरी घेतली आहे. सध्या ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच पंचधातूचे काम हाती घेऊन मार्च अखेपर्यंत या पूर्णाकृती पुतळयाचे काम पूर्ण होणार आहे. हा पुतळा एप्रिल मध्ये जपानला पाठविला जाणार आहे.

हा माझा सन्मान : दाजी पांचाळ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जपान देशाला बनवून देण्याचे मला भाग्य मिळाले आहे. डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बनविण्याचा सन्मान मला मिळाला आहे, असे शिल्पकार दाजी पांचाळ यांनी सांगून मला घडविण्यामागे शिल्पकार नारायण सोनवडेकर यांचा हातभार असल्याचे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version