अखेर शुभमंगल!

1

राणी मुखर्जी गुपचूपपणे निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा याच्याबरोबर इटलीत विवाहबद्ध झाली. कोणत्याही मुलीच्या आयुष्यात येणारी ती एक महत्त्वपूर्ण घटना आहे, तशीच ती राणीच्या बाबतीतही आहे. ती आता चोप्रा घराण्याची सून झाली आहे. चित्रपट क्षेत्रात अशा प्रकारे स्टार्सने गुपचूप केलेली लग्ने अनेक आहेत. यशराज यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांच्याजवळ राहून तिने सुनेचे कर्तव्य आधीच पार पाडले होते. अभिनयाशी ती नेहमीच एकनिष्ठ राहिली आहे. राणीची अभिनयाची उंची जितकी वाढत गेली तितकी ती माणूस म्हणून अधिकाधिक नम्र होत गेली. हा विनम्रपणा तिच्या वृत्तीत आहे. तिच्या स्वभावात आहे. तिचा स्वभाव बोलघेवडा आहे. अधिकाधिक लोकांशी बोलायला आणि लोकांमध्ये मिसळायला तिला खूप आवडते. तिचे वागणे, बोलणे, लोकांमध्ये मिसळणे अत्यत अकृत्रिम असते, मनमोकळे असते, त्यात सहजता असते. समोरच्या माणसाविषयी असलेला स्वाभाविक आदरभाव तिच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येत असतो. राणीच्या विवाहाच्या इतर पैलूंबाबत चर्चा करायचे कारण नाही कारण शेवटी तो तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. राणीच्या जीवनात अनेक चढउतार आले. ते तिने सहजपणे पार केले. राणी कोणत्याही आव्हानांना सामोरी जायला तयार असणारी स्त्री आहे. तिने सगळयाच भूमिका मन लावून केल्याने फिल्मफेअरसारखे मानाचे सात पुरस्कार तिला मिळाले. विविध प्रकारच्या भूमिका तितक्याच ताकदीने करणे, हे राणीचे वैशिष्टय म्हणावे लागेल. तिच्या अभिनयाच्या उंचीच्या आड तिने कधी आपली उंची येऊ दिली नाही. ‘ब्लॅक’ या चित्रपटातली तिची भूमिका एका पारडयात टाकली व इतरांच्या भूमिका दुस-या पारडयात टाकल्या तरी त्याचे वजन अधिक भरेल. तिच्या कारकिर्दीकडे लक्ष टाकले तर तिच्या भूमिकांचे वैविध्यही सहज लक्षात येईल. एका बाजूला ‘गुलाम’मधली कॉलेज कन्या साकारणारी राणी ‘वीर झारा’मध्ये वकिलाच्या करारी, कणखर भूमिका समर्थपणे साकारते. ‘तलाश’मधली गूढ, एकलकोंडी वाटणारी भूमिका साकारणारी राणी दुस-याच बाजूला ‘नो वन किल जेसिका’सारख्या चित्रपटातून शोधपत्रकार साकारली. मराठी माणसांविषयी व मराठी भाषेविषयी आस्था जपणारी राणी आपण मुंबईत वाढलो. त्यामुळे आपल्याला सहज मराठी बोलता येते, याचा अभिमान बाळगून आहे. त्यामुळेच की, काय तिला जेव्हा ‘अय्या’ या चित्रपटात मीनाक्षी देशपांडे ही मराठी मुलगी साकारायला मिळाली तेव्हा ती अगदी आनंदून गेली होती. तिच्या विविध रूपांमध्ये खास नऊवारीतला तिचा फोटो असाच गाजला होता. केवळ अभिनय व आपण एवढयापुरतीच ती मर्यादित राहिली नाही. तिने महिला व लहान मुलांच्या विविध सामाजिक संस्थांसाठी भरीव योगदान दिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून सहकलाकारांबरोबर तिचे नाव जोडले जात राहिले, तिच्या लग्नाच्या वावडया उडत राहिल्या. ती रखडणार, असे वाटत असतानाच तिने लग्न करून सगळयांनाच सुखद धक्का दिला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version