Home महाराष्ट्र कोकण अखेर ३२ तासांनंतर कोकण रेल्वे सुरू

अखेर ३२ तासांनंतर कोकण रेल्वे सुरू

1

तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वे रुळावर आली आहे.

चिपळूण – तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वे रुळावर आली आहे. चिपळूणनजीक खेर्डी येथे मालगाडीचे बारा डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला होता. यामुळे मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाली होती. कोकण रेल्वेच्या कर्मचारी व अधिका-यांच्या अहोरात्र मेहनतीने ३२ तासांनंतर कोकण रेल्वे मार्गावरून सीएसटी-बंगळूरु ही पहिली गाडी धावली आणि खोळंबलेल्या प्रवाशांची सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, अपघातग्रस्त भागातून ताशी १० कि.मी. वेगाने ही गाडी धावणार आहे. उर्वरित काम सुरूच ठेवण्यात आले आहे.

खेर्डी येथे वाशिष्ठी पुलानजीक मंगळवारी सकाळी ७.४० वाजता रत्नागिरी गुड्स ही मालगाडी रुळावरून घसरली. या गाडीचे बारा डबे रेल्वे रुळाच्या दुतर्फा कोसळले व अपघात झाला. गोवा व रत्नागिरीला या मालगाडीतून गहू नेण्यात येत होता. मात्र, या अपघाताने कोकण रेल्वेची सेवा खंडित झाली. तब्बल ३२ तास या मार्गावरील अनेक रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या. तर काही गाडया अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या.

अहोरात्र मेहनतीचे ३२ तास

खेर्डीनजीक झालेल्या रेल्वे अपघातानंतर रत्नागिरीहून रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्याआधी येथील रेल्वे पोलिस तसेच स्थानिक पोलिस व खेर्डी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची एकच गर्दी झाली. रत्नागिरीहून आलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ अपघाताची पाहणी केली. सर्वेक्षण करण्यात आले आणि यंत्रणा कामाला लागली. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कार्यालयातूनदेखील सूत्रे हलली. अपघातस्थळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, गोवा येथून रेल्वेचे कर्मचारी दाखल झाले. कुर्ला व गोवा येथून अ‍ॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन मागवण्यात आल्या. याबरोबरच रत्नागिरीहून मेडिकल व्हॅनदेखील दाखल झाली.

सर्वप्रथम ट्रॅकवर असलेले मालगाडीचे डबे बाजूला करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यासाठी क्रेन मागविण्यात आल्या. तीन क्रेनच्या माध्यमातून एकेक डबा बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू झाला. बारापैकी पाच डबे ३० फूट खोल जाऊन पडले होते. त्यामुळे सात डबे रेल्वे रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सातपैकी सहा डबे बाजूला करण्यात आले. तर ट्रॅकवरील एक डबा बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बाजूला करण्यात आला. त्यानंतर उखडलेला ट्रॅक पूर्ण काढून टाकण्यात आला आणि दोन्ही बाजूंनी पुन्हा नव्याने ट्रॅक टाकण्यात आला. बुधवारी सायंकाळी ३.१५ वाजता नवीन टाकलेला ट्रॅक सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र रेल्वेच्या बांधकाम अधिकाऱ्यांनी कोकण रेल्वेला दिले आणि त्यानंतर इंजिनची चाचणी घेऊन सायंकाळी ४ वाजता चिपळूण रेल्वे स्टेशनहून सीएसटी-बंगळूरु ही पहिली रेल्वेगाडी अपघातग्रस्त ठिकाणावरून धावली. दोन दिवस रेल्वेसेवा बंद असल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे गाडया उशिरानेच धावणार आहेत.

अपघाताची चौकशी होणार

खेर्डीनजीक झालेल्या मालगाडीला अपघाताची चौकशी केली जाणार आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची कारणेदेखील शोधण्यात येत आहेत. मालगाडीच्या खालील रॉड तुटून तो स्लिपरमध्ये अडकला असावा व त्यानंतर दणका बसून गाडी रुळावरून घसरली असावी असे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणी कोकण रेल्वेमार्फत चौकशी करण्यात येईल, असे विभागीय व्यवस्थापक नंदू तेलंग यांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले. त्यांच्या देखरेखीखाली या रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्यात येत होती. ३५० हून अधिक कर्मचारी, रेल्वे पोलिस, स्थानिक पोलिस आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे रेल्वेसेवा सुरळीत करण्यात यश आले.

1 COMMENT

  1. कोंकण रेल्वे म्हणजेच ” कोंकण वासीयांची ” मोठी डोके दुखी आहे ,अजूनही त्याचेवर उपाय सापडत नाही , जय महाराष्ट्र !!!!!

Leave a Reply to Pandudada. Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version