Home संपादकीय तात्पर्य अच्छे दिन कैसे आयेंगे?

अच्छे दिन कैसे आयेंगे?

1

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विधान केले होते. मोदी जर पंतप्रधान बनले तर मी हा देश सोडून देईन, असा भावनिक इशारा त्यांनी दिला होता. लोकसभा निवडणुकीचा निकाल मोदी यांच्या बाजूने लागला आहे आणि लोकांनी मोदी यांच्या पारडय़ात बहुमत टाकले आहे. त्यामुळे मोदीच पंतप्रधान होणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, लेखक अनंतमूर्ती यांनी दिलेल्या भावनिक इशा-यांवरून त्यांना आता विविध माध्यमांमधून टीका, धमक्या सुरू झाल्या आहेत. अनंतमूर्ती हे कर्नाटकातील गुलबर्ग्याच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी या सरकारी विद्यापीठाचे कुलगुरूही आहेत. ८१ वष्रे वयाचे अनंतमूर्ती हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे सा-या देशाला माहीत झालेले आहेत. त्यांच्या या विधानामुळे उडालेली खळबळ लक्षात घेऊन त्यांनी आपले विधान मागे घेतले. आपण भावनेच्या भरात तसे बोललो. आपल्याला तसे म्हणायचे नव्हते आणि कोणत्याही परिस्थिती आपल्याल देश सोडून जायचे नाही, असा खुलासा त्यांनी केला. आपले आपल्या देशावर प्रेम आहे. देशातल्या कोणत्याही एका विशिष्ट राजकीय पक्षाचे आपण समर्थक नाही. भाजपलाही आपण विरोधच करतो आणि काँग्रेसलासुद्धा विरोधच करत असतो, असे स्पष्ट करताना त्यांनी आपल्या विधानावरून आपल्यावर पक्षीय दृष्टिकोनाचा आरोप केला जाऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली. भाजपच्या काही समर्थकांनी कर्नाटक सरकारकडे एक अर्ज केला आणि अनंतमूर्ती यांनी सरकारी नोकरी करत असताना आपला पक्षीय कल व्यक्त करणारे विधान केले असल्यामुळे त्यांना कुलगुरू पदावरून काढून टाकावे, अशीही मागणी केली. आता तर अनंतमूर्ती यांनी नरेंद्र मोदींच्या निवडीचे स्वागतही केले आहे. मात्र, एक्झिट पोलचे निकाल जाहीर होऊन मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता दिसायला लागताच कर्नाटकातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘फेसबुक’वरून या निमित्ताने अनंतमूर्ती यांच्यावर असभ्य भाषेत काही पोस्ट टाकायला सुरुवात केली होती. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. नमो ब्रिगेड नावाच्या संस्थेने अनंतमूर्ती यांना पाकिस्तानात जाता यावे, यासाठी त्यांना १७ मे रोजी कराचीसाठी विमानाचे तिकीट पाठवले होते. या संघटनेचा नेता नरेश शेणॉय याने स्वत:च ही गोष्ट सांगितली. त्यांनी तिकीट पाठवल्याचे सांगितले असले तरी अनंतमूर्ती यांना तिकीट मिळालेले नाही. म्हणजे एकंदरीत हा स्टंटच आहे. अनंतमूर्ती यांच्या वयाकडे बघून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे उद्योग टाळायला पाहिजे होते. विशेषत: एकदा अनंतमूर्ती यांनी खुलासा केल्यानंतर या गोष्टीचे मुळात औचित्यच नव्हते. परंतु आपल्याविरुद्ध बोलेल, त्याला त्रस्त करू, अशी त्यांची भूमिका असून ती लोकशाही विरोधी आहे.

1 COMMENT

  1. असे झाले तर मी देश सोडून जाईन अशी वक्तव्ये करणे म्हणजे एक प्रकारे या देशातील लोकशाहीवर अविश्वास दाखविण्या सारखेच आहे. ८१ वयाच्या जवाबदार पदावरील सुशिक्षित व्यक्ती कडून अशा प्रकारच्या कथित भावनिक वक्तव्याची अपेक्षा नसते. आधी बेताल वक्तव्ये करून नंतर पाठ दाखवणारे राजकारणी आणि यांत काय तो फरक. सामाजिक वक्तव्ये करताना भावनांना आवर घालणे या वयातही अवघड असते का? कोडेच आहे हे.
    सद्य व्यक्तीने आपल्या वर्तनाने आदर्श घालून द्यायचा असतो माफी नामा नाही.
    जसे अनंतमूर्ती यांचे वर्तन समर्थनीय नाही तसेच उत्साही भा. ज. पा. कार्यकर्त्याचे ही.
    उड्डाण पूल झाला तर मी दुबई मध्ये जाईन, हा निवडून आला तर मी देश सोडून जाईन, अर्रे चाललाय तरी काय तुमचे, जर तुम्हाला या देशाची गरज नसेल तर देशालाही तुमची नाही.
    अरे त्यांनी नाही केला तुम्ही तरी करा रे यांच्या वयाचा विचार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version